Soyabean Farming : जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची लागवड करण्याच्या तयारीत असाल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरंतर या वर्षी चांगला पाऊसमान राहणार असा अंदाज नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे. सोयाबीन उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र या राज्याचा संपूर्ण देशात दुसरा क्रमांक लागतो. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% एवढे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात घेतले जाते.
राज्यात याची लागवड विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर तथा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये पाहायला मिळते. यावरून या पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अवलंबित्व असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे यावर्षी चांगला पाऊस होणार असा अंदाज असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र काहीसे वाढू शकते असे म्हटले जात आहे.
तथापि सोयाबीनच्या पिकातून जर चांगले विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर याच्या सुधारित जातींची लागवड करणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे आज आपण कृषी तज्ञांनी सुचवलेल्या टॉप पाच सोयाबीन वाणाची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सोयाबीनच्या टॉप 5 जाती आणि त्यांच्या विशेषता
JS 335 : जेंएस 335 या जातीची संपूर्ण महाराष्ट्रभर लागवड केली जाते. राज्याबाहेर देखील या जातीची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याची माहिती दिली जात आहे. या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 100 दिवसांचा आहे. म्हणजेच पेरणी केल्यानंतर शंभर दिवसांनी या जातीपासून उत्पादन मिळते.
जर तुम्ही या वाणाची निवड केली तर पेरणीसाठी एकरी 25 किलो एवढे बियाणे तुम्हाला पेरावे लागणार आहे. या वाणाची लागवड बागायती भागात केली पाहिजे. याची कोरडवाहू भागात लागवड केली तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. यामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
जेंएस 9305 : सोयाबीनचा हा आणखी एक लोकप्रिय वाण आहे. विशेष म्हणजे या जातीचे पीक लवकर काढण्यासाठी तयार होते. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे अवघ्या 95 दिवसांच्या कालावधीत या जातीचे पीक परिपक्व होते. उत्पादनात देखील या जातीचा वाण सरस आहे. विशेष म्हणजे कोरडवाहू भागात याची लागवड केली जाऊ शकते. मात्र एकरी बियाण्याचे प्रमाण थोडेसे वाढवावे लागणार आहे. या जातीची जर तुम्ही पेरणी करत असाल तर एकरी 30 ते 35 किलो एवढे बियाणे पेरले पाहिजे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे दाट लागवडीसाठी हा वाण चालतो.
KDS 726 : केडीएस 726 किंवा फुले संगम हा राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला सोयाबीनचा एक सुधारित वाण आहे. या जातीची लागवड बागायती भागात केल्यास चांगले उत्पादन मिळते. कोरडवाहू भागात याची लागवड करू नये असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या जातीचा पीक परीपक्व कालावधी हा 110 दिवसांचा आहे. जर तुमच्याकडे ओलिताची सोय असेल तर तुम्ही या जातीची लागवड करू शकता. मात्र या जातीची पेरणी करताना एकरी 20 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्ही टोकन पद्धतीने याची लागवड केली तर एकरी 15 किलो बियाणे यासाठी पुरेसे ठरेल असा दावा केला जात आहे.
के डी एस 753 : के डी एस 753 किंवा फुले किमया हा देखील राहुरी विद्यापीठाने विकसित केलेला सुधारित वाण आहे. या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा 100 दिवसांचा आहे पेरणीसाठी एकरी 20 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला विद्यापीठाने दिलेला आहे तसेच जर टोकन पद्धतीने शेतकरी लागवड करत असतील तर एकरी 15 किलो बियाणे पुरेसे ठरते असा दावा तज्ञांनी केलेला आहे.
डी एस 9560 : हा देखील कमी कालावधीत काढणीसाठी तयार होणारा वाण आहे. कोरडवाहू भागात देखील या जातीची पेरणी केली जाऊ शकते. बियाणे पेरणी करताना एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरण्याचा सल्ला दिला आहे. या जातीचे पीक अवघ्या 95 दिवसात परिपक्व होत असल्याचा दावा तज्ञांनी केलेला आहे.