Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% सोयाबीनचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. तसेच एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेश मध्ये घेतले जाते. अर्थातच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे.
मात्र आपल्या भारतात सोयाबीनचे दोन प्रकारचे उत्पादन घेतले जाते. आपल्या देशात धान्याबरोबरच सोयाबीनच्या हिरव्या शेंगांचे देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. झारखंड सारख्या राज्यांमध्ये सोयाबीनच्या हिरव्या शेंगांचे उत्पादन सर्वाधिक घेतले जात असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
आपल्या महाराष्ट्रात मात्र हिरव्या शेंगांचे उत्पादन फार कमी प्रमाणात घेतले जात आहे. पण सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना बाजारात चांगली मागणी असते. सोयाबीनच्या हिरव्या शेंगा भाजीपाला म्हणून आहारात समाविष्ट केल्या जातात. याच्या सेवनाने मानवाच्या आरोग्याला चांगले फायदे मिळतात.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या अशा काही जातींची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्यापासून शेतकऱ्यांना हिरव्या शेंगांचे चांगले विक्रमी उत्पादन मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
HAVSB-24 : सोयाबीनची ही एक प्रमुख जात आहे. या जातीची लागवड हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळवण्यासाठी केली जाते. ज्या शेतकऱ्यांना हिरव्या शेंगांचे उत्पादन घ्यायचे असेल ते शेतकरी बांधव या जातीची पेरणी करू शकतात. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, या जातीच्या हिरव्या शेंगांच्या बिया गरम पाण्यात शिजवल्या की यातून बासमती तांदळासारखा एक अद्भुत सुगंध येतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयाबीनची या जातीची पेरणी केल्यानंतर अवघ्या 60 ते 65 दिवसात म्हणजेच दोन महिन्यात या जातीचे पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते. या जातीपासून हेक्टरी 13 ते 15 टन एवढे हिरव्या शेंगांचे उत्पादन मिळवता येणे शक्य असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे.
स्वर्ण वसुंधरा : ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनच्या हिरव्या शेंगांचे उत्पादन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही जात परफेक्ट ठरणार आहे. ही जात ICAR-RCER संशोधन केंद्र, रांची यांनी विकसित केली असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे लागवड केल्यानंतर 75 ते 80 दिवसांनी या जातीचे पीक तोडणीसाठी तयार होते. या जातीपासून हिरव्या शेंगांचे हेक्टरी 12 ते 15 टन एवढे उत्पादन मिळते.