Farming News : श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली असताना तालुक्यातील काही भागात मृग तसेच आर्द्रा नक्षत्रात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मात्र, पेरणी योग्य पाऊस नसताना पाऊस होईल,
या आशेवर शेतकऱ्यांनी ८८४५ हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका, या सारख्या पिकांची पेरणी केली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
मृगनक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही जिल्ह्यातील ६० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असताना तालुक्यातील घोड तसेच कुकडी तसेच जिरायत पट्ट्यातील ठराविक भागात पडलेल्या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना नवसंजीवनी दिल्याचे चित्र आहे.
पावसाच्या सुरूवातीच्या काळात तालुक्यातील काही भागात बऱ्यापैकी पाऊस झाला; परंतू मध्यंतरी पावसाची उसंत टेन्शन देणारीच ठरली… अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्या करत असताना थोडा हात आखडता घेतला होता.
मागील आठवड्यापासून श्रीगोंदा शहरास तालुक्यातील काही भागात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने वातावरणातील उकाडा कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.
मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर पावसाने हजेरी लावली होती, त्यामुळे यंदा बऱ्यापैकी पाऊस पडेल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या लागवडीला सुरूवात होऊन शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग दिसून आली.
मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात यंदा २६ हजार ३३८ हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी होईल, असा अंदाज आहे. आज घडीस बाजरी २४९७ हेक्टर, मका १६४० हेक्टर, तूर १०९७ हेक्टर, मूग ५४८ हेक्टर, उडीद ६०६ हेक्टर, सोयाबीन १४७ हेक्टर, कापूस २१८१ हेक्टर, अशी एकूण ८८४५ हेक्टर म्हणजे साधारणतः ३४ टक्के पेरण्या आटोपल्याचे आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे.
■ खरीप हंगामातील पिकांचा पीकविमा उतरविण्यासाठी शासनाने अवघ्या १ रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजना आणली असून, या योजनेत आतापर्यंत दोन हजार २९६ शेतकऱ्यांनी पीकविमा काढत लाभ घेतला असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत खरीप हंगामाच्या पिकांचा विमा अधिकृत सीएससी सेंटरवर जाऊन उतरवावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी केले आहे.