अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे सध्या खरीप पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव सुरु आहे. सध्या शेतात मूग, सोयाबीन आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत.
परंतु या रिपरिपीमुळे सध्या पिके अडचणीत आले आहेत. या पिकावर विशेषतः सोयाबीन पिकामध्ये चक्री भुंगा आणि उंटअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चक्रीभुंगा किडीची मादी पानाचे देठ, खोड यावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालतो. खापांच्या मध्ये खालच्या खापेजवळ तीन छिद्रे करते.
अंडी उबवण झाल्यानंतर अळी पानाचा देठ आणि खोडात शिरते व जमिनीकडील दिशेने आतील भाग पोखरून खाते. खोडावर केलेल्या खाचाच्या वरचा भाग पिवळा पडतो व सुकून वाळतो. सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळत आहे.
अळीचा रंग फिकट हिरवा असून, शरीरावर मध्यभागी निळसर हिरवी रेषा असते व रेषेच्या कडा पांढऱ्या असतात. अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजूंस फिकट पिवळी रेषा असते. लहान अळ्या पानाचा खालचा हिरवा भाग खरवडून जातात.
त्यामुळे पानाचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. अळी मोठी झाल्यावर पानांना छिद्र पाडून खाते. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास झाडाची संपूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक ठेवतात. याशिवाय फळे वाटली बी देखील खाते.
निंबोळी अर्क ठरेल फायदेशीर
या किडीच्या प्रादुर्भावावर निंबोळी अर्क हा फायदेशीर ठरू शकतो. रस शोषक कीटक आणि लहान सुरवंट यांच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्कचा उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही यासाठी याचा वापर करू शकता.
निंबोळी अर्क बनवण्यासाठी पाच किलो कडुनिंबाची हिरवी पाने, पाच किलो सुकलेली बारीक केलेली निंबोळी घ्या. पाने किंवा निंबोळी पावडर १०० लिटर पाण्यात टाका. त्यात ५ लिटर गोमूत्र टाकून एक किलो गायीचे शेण मिसळा.
हे मिश्रण लाकडाने ढवळून ४८ तास झाकून ठेवा. मिश्रण दिवसातून तीन वेळा ढवळा आणि ४८ तासांनंतर कापडाने गाळून पिकावर फवारणी करा. याने नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल.