अहमदनगर जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र मृग नक्षत्रातील पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, वाफसा मिळेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा मूग, बाजरी, सोयाबीन, मका आदी नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. वेळेवर पाऊस झाल्याने मूग व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे.
शासनाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर दिलासा मिळत आहे तर याच पेरणीसाठी लागणाऱ्या खते व औषधांवर मोठ्या प्रमाणात जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे बियाण्यासाठी दिलेले अनुदान शासन खते व औषधांवर टॅक्स आकारून तर वसूल करत नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
यंदा खते व बियाण्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र शासन स्तरावरही शेतकऱ्यांना मदत व्हावी या हेतूने बियाण्यासाठी अनुदान योजना देण्यात येत आहे. यामध्ये २५ ते ५० टक्क्यांपर्यंत बियाण्यांवर अनुदान देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आधार होत आहे. मात्र दुसरीकडे या बियाणांबरोबर शेतकऱ्यांना रासायनिक खतेही पेरावी लागतात.
त्यांच्या किमतीत झालेली भरमसाठ दरवाढ, त्यावर सरकारचा जीएसटी यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अगदी बियाण्यांना पेरणीपूर्वी निर्जंतुकीकरणासाठी चोळल्या जाणाऱ्या औषधांवरही १८ टक्क्यांपर्यंत जीएसटी आकारला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुशंघाने शासन बियाण्यांवर अनुदान देत आहे. परंतु असे असले तरी दुसरीकडे रासायनिक खते व औषधांवर बेसुमार टॅक्स वसूल केलाजात असल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.
मूग व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार
वेळेवर पाऊस झाल्याने मूग व सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मागील वर्षी नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
त्यानुसार मृग नक्षत्रातील पावसाने नगर तालुक्यात जोरदार सलामी दिली. वेळेवर पाऊस झाल्याने मूग, बाजरी, तूर, मका पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात होण्याची चिन्हे आहेत. तसेच लाल कांदा, रांगडा कांदा लागवडही वाढणार आहे.