कृषी

Success Story : ऊस उत्पादक शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! सेंद्रिय गूळ उत्पादनातून कमवतोय हेक्टरी साडेचार लाख, इतरांसाठी ठरतोय गुरु

Published by
Ajay Patil

Success Story : महाराष्ट्रात ऊस या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचा ओढा ऊस या बागायती पिकाकडे अधिक आहे.

मात्र उसाचे क्षेत्र वाढत असल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न सर्वाधिक आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर एफ आर पी देखील मिळत नाही.

एकरकमी एफ आर पी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे, मात्र तूर्तास यावर शासनाकडून कोणताच निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत एक ना अनेक अडचणींचा सामना करत ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक नसून अडचणीचे पीक बनले आहे.

मात्र जर ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कारखानदारांवर अवलंबून न राहता स्वतःच उसावर प्रक्रिया केली तर निश्चितच ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक बनणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने हे खरं करून दाखवत आहे.

जिल्ह्यातील देवजना येथील प्रयोगशील शेतकरी संतोष कल्याणकर यांनी ऊस कारखान्याला न देता उसावर प्रक्रिया करून सेंद्रिय गुळ निर्मितीतून लाखों रुपये कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या कल्याणकर यांचा हा प्रयोग महाराष्ट्रात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

संतोषजी यांनी आपल्या वडिलोपार्जित शेती पैकी अडीच एकर शेत जमिनीत गेल्या अनेक वर्षांपासून ऊसाची शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने उसाचे उत्पादन घेतले आहे अन त्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय गुळ तयार केला जात आहे. अडीच एकरातून मिळणाऱ्या उसापासून 70 क्विंटल सेंद्रिय गुळाचे उत्पादन होते.

विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या गुळाला बाजारात मोठी मागणी असून यापासून त्यांना साडेचार लाखांचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे एकीकडे ऊस उत्पादक शेतकरी बांधव वेळेवर एफ आर पी मिळत नसल्याने तसेच वेळेवर उसाची तोड होत नसल्याने चिंतेत सापडला आहे तर दुसरीकडेकल्याणकर उसापासून शाश्वत उत्पन्न घेत आहेत.

संतोष जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय गुळाला बाजारात 60 ते 65 रुपये प्रति किलोचा दर मिळतो. अशा पद्धतीने 70 क्विंटल सेंद्रिय गुळातून त्यांना साडेचार लाखांपर्यंतची कमाई होत आहे. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेला गुळ ते बाजारात विकत नसून लोक स्वतः घरी येऊन त्यांच्याकडून गूळ खरेदी करून जातात. यामुळे वाहतुकीसाठी होणारा खर्च त्यांचा वाचतो.

परिणामी उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे वेळेची देखील बचत होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सुरुवातीला कल्याणकर यांनी केवळ अर्धा एकर शेतजमिनीत सेंद्रिय पद्धतीने उसाची शेती केली. यामध्ये त्यांनी आंतरपीक घेतले होते. उसापासून कमी उत्पन्न मिळालं मात्र आंतर पिकातून चांगले उत्पन्न मिळाले होते.

यानंतर त्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत सेंद्रिय गुळाची मागणी लक्षात घेऊन सेंद्रिय गुळ उत्पादित करण्यासाठी उसाचे क्षेत्र वाढवले. आता अडीच एकर क्षेत्रावर उसाची शेती केली जात असून यातून मिळणाऱ्या उसापासून सेंद्रिय गूळ तयार केला जातो.

कल्याणकर यांनी उत्पादित केलेला ऊस त्यांचे बंधू दीपक यांच्या गुऱ्हाळ्यावर गुळ निर्मितीसाठी टाकला जातो. निश्चितच, अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत असताना कल्याणकर यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil