कृषी

पुण्याच्या शेतकऱ्याचा नांद नाही करायचा…! पट्ठ्याने पेरूच्या 650 झाडातून मिळवलं तब्बल 16 लाखांचं उत्पन्न, वाचा या यशाचे गमक

Published by
Ajay Patil

Successful Farmer: भारतातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात मोठा अमुलाग्र बदल करत आहेत. शेतकरी बांधव आता नगदी (Cash Crop) तसेच फळबाग लागवड करण्याकडे वळला असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे फळबाग लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची देखील सिद्ध होत आहे.

उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी केलेली फळबाग लागवड त्यांच्यासाठी आता वरदान सिद्ध होत आहे. काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावले जाऊ शकते.

पुणे जिल्ह्यातील (Pune) एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत पेरू लागवड करून लाखों रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधली आहे. जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील दिवेमधील जाधव वाडी येथील अतुल रामचंद्र जाधव यांनी पेरूच्या अवघ्या साडे सहाशे झाडातून 16 लाख रुपयांची कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या अतुलरावांची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे.

अतुल राव हे एक प्रयोगशील शेतकरी असून अतुल राव नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. अतुल राव यांनी केलेली पेरू लागवड (Guava Farming) देखील प्रयोगाचा एक भाग आहे. अतुल राव यांच्याकडे सध्या बाराशे पेरूची झाडे आहेत. यामध्ये रत्नदीप जातीच्या पेरूची सव्वातीनशे झाडे आहेत. यातून त्यांना तब्बल 12 लाखांची कमाई झाली.

शिवाय सरदार जातीच्या पेरूच्या झाडा पासून त्यांना चार लाखांची कमाई झाली. अतुल यांच्या बागेत असलेली 430 झाडे अजून लहान आहेत. येत्या काही दिवसात या लहान झाडांपासून देखील उत्पन्न मिळणार आहे.

अतुल राव यांनी पेरूच्या झाडांना फक्त सेंद्रिय खत दिले आहे. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने देखील दर्जेदार उत्पादन मिळवून दाखवणाऱ्या अतुल रावांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अतुल राव पिकाच्या वाढीसाठी कुजलेले शेणखत तसेच निंबोळी पेंड सारख्या सेंद्रिय खतांचा वापर करतात.

अतुल राव यांनी पेरू लागवड केल्यानंतर योग्य नियोजन केले. यामुळे आजच्या घडीला अतुल राव यांना एका झाडापासून जवळपास 140 किलो उत्पादन मिळत आहे. अतुल यांनी उत्पादित केलेल्या पेरूला 35 ते 60 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना चांगला बक्कळ पैसा पेरूच्या शेतीतून प्राप्त होत आहे. निश्चितच अतुल रावांचे हे यश इतरांना प्रेरणा देणारे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil