कृषी

सोयाबीनच्या आगमनाने सुर्यफुलाचे दर्शन दुर्मिळ

Published by
Sushant Kulkarni

१५ जानेवारी २०२५ सुपा : हलक्या, मध्यम प्रतीच्या जमिनीत, कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधीत, एकरी सात ते आठ क्विंटलचा उतारा देणारे हे पीक आहे.अतिवृष्टीने सोयाबीन सारखे हे पिक हातचे जात नाही.पाणी कमी लागत असल्याने अत्यल्प पर्जन्यमानातही पिक तग धरते.त्यामुळे उत्पन्न घटत नाही.

पेरणीनंतर एकदोन कोळपणीवर पिक जोमात येते.सुपाच्या आकाराएवढी येणारी सुर्यफुले शेतकऱ्यास आर्थिक समृद्धी देणारी आहेत.ज्वारी, बाजरीच्या पिकातील सुर्यफुलाचे पिक कुटुंबाला वर्षाकाठी लागणाऱ्या खाद्यतेलाची सोय करणारे असले तरी, काळाच्या ओघात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने हे पीक दुर्लक्षिले जाऊ लागल आहे.

पीक आर्थिक दृष्ट्या किफायत शीर असले तरी सोयाबीनचे अवास्थव वाढलेले प्रस्थच सुर्यफुलाच्या पिछाडीस कारणीभूत असल्याचे दिसून येते.सेंद्रिय शेण खताच्या जोरावर पिके घेतली जायची तेव्हा सुर्यफुलाच्या ताट्यावर पराग कण वेचण्यासाठी मधमाश्यांचा गोंगाट असायचा.बांधावरील झाडा झुडपावर मधमाशांची पोळ आढळून यायची.

काळ बदलत गेला.सुर्यफुलाचे ताटवे दिसेनासे झालेत.रासायनिक विषारी औषधांमुळे मधमाशा नाहिशा होत गेल्याने बांधावरील, डोंगर कपारीतील मधमाशांचे पोळे आढळून येणे दुर्मिळ झाले आहे. सुर्यफुलाचे दाणे सेवन केल्याने हृदयरोग व मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते.कोलेस्टेरॉल व रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते.तेलाचे आहारातून नियमित सेवन झाल्यास शुक्राणू बळकट होण्यास मदत होते.प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो,असे शास्त्रीय निष्कर्ष आहेत.

सिंचन व्यवस्थेमुळे जिराईत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले असून,त्याचा परिणाम खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या कडधान्याच्या उत्पन्नावर झाला तसा खाद्य तेलाच्या उत्पन्नासाठी घेतल्या जाणाऱ्या सुर्यफुलाच्या पिकावरही झाला आहे.

सिंचन क्षेत्र वाढाण्यापूर्वी सुर्यफुलाचे उत्पन्न भुईमूग, ज्वारी, बाजरी आदि पिकांमध्ये घेतले जायचे. शेती कमी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात अडतासाला हमखास सुर्यफुलाचे ताटवे उठून दिसायचे. हल्लीमात्र हे चित्र पुसटसे झाले असून सद्यस्थितीत सुर्यफुल दिसणे दुर्मिळ झाले आहे.

Sushant Kulkarni