कांदाविक्री बंदला एपीएमसी व्यापाऱ्यांचा पाठिंबा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क ४० टक्के वाढवल्याने त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच बाजार समित्यांमधून निर्यात शुल्क वाढीचा निषेध व्यक्त केला जात आहे.

नाशिक येथील व्यापारी असोसिएशनने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी देखील पाठिंबा देणार असून गुरुवार, २४ ऑगस्ट रोजी संपूर्ण कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

बाजारात कांद्याचे दर वाढत असताना केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले आहे. याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

सर्वाधिक कांदा विक्री होणाऱ्या नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत सोमवारपासून कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. मात्र मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक सुरू होती.

निर्यात शुल्काविरोधात राज्यातील व्यापारी संघटनांनी बंदची हाक दिल्याने वाशीतील कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनीही या बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी गुरुवारी कांदा-बटाटा बाजार बंद ठेवणार असल्याची माहिती कांदा-बटाटा बाजाराचे संचालक अशोक वाळंज यांनी दिली.