कृषी

उच्चशिक्षित जगदाळे दांपत्याच्या जीवनात तैवान पिंक पेरूने आणली आर्थिक समृद्धी! पहिल्याच वर्षी मिळाले 24 लाख रुपयांचे उत्पन्न

Published by
Ajay Patil

फळबाग लागवडीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधणे हे आता बऱ्याच शेतकऱ्यांनी शक्य करून दाखवलेले आहे. अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणी आता  शेतीमध्ये आल्याने शेतीमध्ये मोठमोठे बदल होताना आपल्याला दिसून येत आहेत व पारंपारिक पिकांऐवजी आता मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या फळ पिकांची लागवड करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती यांचा योग्य ताळमेळ आता तरुणांनी घातल्यामुळे शेती फायद्याची होईल असे चित्र दिसून येत आहे. कमीत कमी क्षेत्रामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न घेण्याची किमयादेखील आता या उच्च शिक्षित शेतकऱ्यांनी करून दाखवलेली आहे.

अगदी याच मुद्द्याला जर आपण करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावचे उच्चशिक्षित शेतकरी दांपत्य विजय नामदेव जगदाळे व त्यांच्या पत्नी प्रियंका जगदाळे याची यशोगाथा पाहिली तर ती इतर तरुणांना प्रेरणा देणारी आहे.

 तैवान पिंक पेरूतून मिळवले पहिल्या वर्षी 24 लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावचे उच्चशिक्षित शेतकरी दांपत्य विजय नामदेव जगदाळे व त्यांच्या पत्नी प्रियंका जगदाळे या दाम्पत्त्याने जिद्द आणि कष्टाच्या जोरावर दीड एकरामध्ये तैवान पीक पेरूची बाग फुलवली व या बागेतून पहिल्याच वर्षी त्यांना तब्बल 24 लाख 20 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले.

जगदाळे दांपत्याने  पारंपारिक शेती व पारंपरिक पिकांची लागवड टाळून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना तैवान पिंक पेरूची लागवड करावी हे निश्चित केले व याकरिता मार्च 2023 मध्ये 1550 तैवान पिंक पेरूच्या जातीच्या रोपांची लागवड दीड एकर क्षेत्रामध्ये केली.

या पेरू रोपांची लागवड करण्यासाठी दोन ओळीत आठ फूट व दोन रोपांमध्ये पाच फूट इतके अंतर ठेवून योग्य प्रमाणात रासायनिक व शेणखताचा वापर करून योग्य व्यवस्थापन ठेवले. त्यांना पेरूच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंत संपूर्ण खर्च पाच लाख पन्नास हजार रुपये इतका आला.

तैवान पिंक पेरूची लागवड केल्यानंतर जवळपास 18 महिन्यात पेरू काढणीसाठी तयार झाला व काढणी केल्यानंतर त्यांच्या शेताच्या बांधावरच पन्नास रुपयांपासून ते 85 रुपये प्रति किलो दराने मुंबई आणि पुणे येथील व्यापाऱ्यांनी या पेरूची खरेदी केली.

जगदाळे यांना दीड एकर क्षेत्रातून तब्बल 36 टन पेरूचे उत्पादन मिळाले व त्यातून 24 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फायदा त्यांना झाला. व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर त्यांनी रोगापासून पेरू बागेचे संरक्षण व्हावे याकरिता क्रॉप कव्हर व प्लास्टिक बॅगचा वापर केला व पेरूची गुणवत्ता राखण्यात यश मिळवले.

 जगदाळे यांनी केलेला जीवामृतचा वापर पेरूसाठी ठरला फायद्याचा

त्यांनी बऱ्याच प्रमाणे या पेरू बागेला सेंद्रिय घटकाचा देखील पुरवठा केला. यामध्ये त्यांनी देशी गायीचे शेण तसेच गोमूत्र, गूळ व कडधान्याचे पीठ यांचे प्रमाणानुसार मिश्रण करून त्याचे वस्त्रगाळ  करून प्रत्येक आठ दिवसाला ठिबकच्या साह्याने ते झाडांना दिले त्यासोबत ज्या दीड एकर बागेला सहा ट्रॉली शेणखताचा वापर देखील केला.

जीवामृतचा वापर केल्यामुळे जमिनीमध्ये उपयुक्त असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढली तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास देखील मदत झाली व या सगळ्या गोष्टींमुळे पेरूच्या झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागून  झाडाची योग्य वाढ व झाडांना फुलांचे प्रमाण वाढले व यापुढे पेरू उत्पादनात वाढ झाली.

Ajay Patil