Onion News : शेतकऱ्यांच्या समस्या मिटण्याचे नाव घेत नाही. अस्मानी सुलतानी संकटाची मालिका झेलत शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करतो परंतु उभे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या नशिबी मात्र वानवाच येते.
आता पुन्हा एकदा सरकारी निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निर्यातबंदी मुळे कांद्याचे भाव अक्षरशः २७०० रुपयांनी कोसळले आहेत.
कांदा उत्पादकांना फटका
कांद्याचे भाव चांगलेच वाढले. कांदा अगदी ४० रुपये किलोपर्यंत गेला. आनंदित झालेल्या शेतकऱ्याने आर्थिक गणिते बसवण्याची स्वप्ने पाहिली परंतु काल अचानक कांदा २७०० रुपयांनी घसरला. त्यामुळे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेले शेतकरी संतप्त झाले. गुरुवारी लाल कांद्याला ४२५१, तर उन्हाळ कांद्याला ४५०० रुपये भाव होता. शुक्रवारी तो १८०० रुपयांवर आला. त्यामुळे शेतकरी चांगलेच संतापले होते.
हजारो शेतकरी रस्त्यावर
कांद्याचे भाव एकाच दिवसात २७०० रुपयांनी घसरत १८०० रुपयांवर आल्याने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी दीड वाजता बाजार समिती समोरील नाशिक-पुणे महामार्गवर रास्ता रोको आंदोलन केले. तब्बल दीड तास शेतकऱ्यांनी रस्ता रोकुन धरला होता. हजारो कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले होते. याची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पथकाने आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. दूध, कापूस, कांदा व अन्य शेतमालाला हमीभाव द्या अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली. दरम्यान प्रशासनाने कांद्याचे दर वाढवण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पारनेरमध्येही संतप्त पडसादात
कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त पडसात पारनेरमध्येही उमटले. पारनेरमध्ये कांद्याला शुक्रवारी दीड ते दोन हजारांचा भाव मिळाला. यामुळे कांदाउत्पादकांनी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
कांद्याचे दर अचानक कमी का झाले ?
कांद्याच्या दारात एकाच दिवसात निम्म्याने घट झाली. कांद्याला ३१०० रुपये भाव असताना तो अचानक १८०० रुपयांपर्यंत आला. केंद्राने निर्यात बंद केल्यामुळे भाव कोसळले आहेत असे शेतकरी सांगत आहेत.