Dodka Lagvad:- भाजीपाला पिके म्हटले म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता या पिकांमध्ये असते व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजीपाला पिकांमुळे शेतकऱ्यांच्या हातात दररोज पैसा खेळता राहू शकतो.
त्यामुळे भाजीपाला लागवड नक्कीच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणारी असते. सध्याच्या कालावधीत आता भाजीपाला लागवडीमध्ये देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने शेतकरी शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यामध्ये सिमला मिरची तसेच फुलांचे उत्पादन व इतर भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पादन मिळवू लागले आहेत.
त्यामुळे कुठल्याही भाजीपाला पिकाची लागवड जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केली तर भरघोस उत्पादन तरच मिळते परंतु त्यापासून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळते. भाजीपाला पिकांमध्ये वेलवर्गीय पिकांचा विचार केला तर कारले तसेच काकडी व दोडके ही महत्त्वाची पिके आहेत व कमी कालावधीतील पिके असल्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवणे शक्य होते.
अगदी याच पद्धतीने वाळवा तालुक्यातील आष्टा येथील सुधीर उर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर या शेतकऱ्याने एक एकर दोडका लागवडीतून तब्बल अडीच लाख रुपयांची उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघू.
एका एकर दोडका लागवडीतून मिळाले अडीच लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वाळवा तालुक्यातील आष्टा या गावचे प्रगतीशील शेतकरी सुधीर उर्फ विजय शिंदे यांनी दोडका लागवड करायची ठरवले व एका एकर मध्ये दोडका लागवडीचे नियोजन केले. याकरिता त्यांनी पाच फूट बाय अडीच फूट अंतरावर अगोदर लावलेल्या दोडक्याच्या शेतातच पुन्हा दोडक्याच्या माला एफ वन या जातीची 25 ऑगस्ट रोजी लागवड केली.
याकरिता त्यांनी मल्चिंग पेपर तसेच दोडक्याच्या वेलींना आधार हवा म्हणून काठी आणि तार यांचा वापर केला. पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन केले व ठिबकच्या माध्यमातून पाण्यात विरघळणारी रासायनिक व सेंद्रिय खते दोडका पिकाला पुरवली व याचा नक्कीच फायदा दोडक्याच्या उत्पादन वाढीमध्ये झाला.
तसेच शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांचा सर्वात जास्त वापर करण्यावर भर दिला. दोडका लागवडीनंतर साधारणपणे दीड महिन्यानंतर उत्पादन मिळायला सुरुवात झाली व दररोज एका एकर मधून त्यांना 200 ते 250 किलो उत्पादन मिळत आहे.
किती मिळत आहे त्यांना बाजारपेठेत दर?
सध्या शिंदे यांना प्रतिकिलो तीस ते पस्तीस रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. एका एकर मध्ये साधारणपणे दहा टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा त्यांना असून दररोज ते 200 ते 250 किलो दोडक्याची विक्री करत आहेत. प्रति दहा किलो तीनशे रुपये या दराने ते सध्या विक्री करत आहेत.
तीन महिन्यांमध्ये त्यांना अडीच लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच आष्टा परिसराच्या आजूबाजूला असलेल्या बागणी तसेच कवठेपिरान येथील व्यापारी त्यांच्या शेताच्या बांधावर येऊन दोडका खरेदी करत असल्याने त्यांचा वाहतूक खर्च वाचल्याने वाढीव नफा मिळत असल्याने फायदा होत आहे.
आतापर्यंत त्यांना साधारणपणे पाच टन उत्पादन मिळाले असून अजून पाच टन उत्पादन मिळण्याच्या अपेक्षा त्यांना आहे. आतापर्यंत त्यांना एका एकर करिता 50 हजार रुपये खर्च झाला आहे व अजून पाच टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा असून एकूण अडीच लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळण्याचे अपेक्षा आहे व यातून पन्नास हजार खर्च वजा जाता 2 लाख रुपये निव्वळ नफा त्यांना या माध्यमातून मिळणार आहे.