कृषी

कार्यकारी सोसायट्या होणार शेती मॉल

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : विविध कार्यकारी सोसायट्यांचे रूपांतर आता शेतीसाठीच्या मॉलमध्ये होणार आहे. या सोसायट्यांत बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतीची अवजारे अशा शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू एकाच छताखाली म्हणजे या सोसायट्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.

प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र ही सध्याची किरकोळ खत विक्री दुकाने मॉडेल खत विक्री दुकानामध्ये रूपांतरित करून शेतीसाठी वन स्टॉप शॉप म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

त्याअंतर्गत खते आणि बी-बियाण्यांबरोबरच सर्व प्रकारच्या सुविधा या सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात सुमारे २० हजार विविध कार्यकारी सोसायट्या आहेत. पहिल्या टप्प्यात ६०० सोसायट्यांचे रूपांतर मॉलमध्ये करण्यात आले आहे.

या सुविधेमुळे शेतकऱ्यांना गावातच चांगली व दर्जेदार बी-बियाणे मिळण्याबरोबरच सर्व प्रकारच्या शेतीसाठीच्या आवश्यक त्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यकारी सोसायट्यासुद्धा स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे,

असे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले. पुढील टप्प्यात या सोसायट्यांमधून पशुखाद्यदेखील उपलब्ध करून देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने सहकारी संस्थांबाबत अनेक मोठे निर्णय घेतले असून, त्यांची अंमलबजावणी राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सोसायट्या आर्थिकदृष्ट्या बळकट होणे व त्या माध्यमातून पतपुरवठा, विविध सेवा व वस्तूंचा पुरवठा ग्रामीण भागातील जनतेला व्हावा,

या दृष्टिकोनातून या संस्थांचे संगणकीकरण होत आहे. या संस्थांच्या पोटनियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच या संस्थांना १५२ प्रकारच्या वस्तू व सेवांचा व्यवसाय करता येईल,

अशीही तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सोसायट्यांमध्ये बी-बियाणे विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच जास्तीत जास्त सोसायट्यांमधूनही शेतकऱ्यांना बी-बियाणे देण्यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे.

Ahmednagarlive24 Office