कृषी

शेतकऱ्याने 3 एकर केळीपिकातून घेतले तब्बल 20 लाखांचे उत्पन्न! केळी भरलेल्या वाहनाची शेतापासून-गावापर्यंत काढली वाजत गाजत मिरवणूक

Published by
Ajay Patil

केळी म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर पटकन येते ते जळगाव जिल्ह्याचे नाव. जळगाव जिल्ह्यामध्ये अगदी कित्येक वर्षापासून केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व जळगाव जिल्ह्याला प्रामुख्याने केळीचे आगार म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातील जामनेर, चोपडा तसेच रावेर व यावल इत्यादी तालुक्यांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते.

आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जळगाव जिल्ह्यातून केळी पाठवली जाते. जर आपण जामनेर तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्प झाल्यामुळे या परिसरात केळीची लागवड हळूहळू वाढत असून तंत्रज्ञानाच्या वापराने शेतकरी आता कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस केळीचे उत्पादन मिळवत आहेतच व निर्यातयोग्य आणि दर्जेदार उत्पादनावर भर देताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच पद्धतीने जर आपण जामनेर तालुक्यातील शहापूर येथील सागर विजय पाटील या तरुण शेतकऱ्याचे उदाहरण बघितले तर या शेतकऱ्याने तंत्रज्ञानाचा वापर करत पावणेतीन एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली व या माध्यमातून त्यांनी तब्बल वीस लाख 1 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले.

इतकेच नाही तर त्यांनी पिकवलेल्या या केळीला चांगला दर मिळाल्यामुळे आनंदाच्या भरात त्यांनी शेतात काढलेल्या केळीच्या घडाने भरलेल्या वाहनांची थेट शेतापासून तर गावापर्यंत गुलाल उधळत वाजत गाजत मिरवणूक काढली.

 पावणे तीन एकर केळी पासून मिळवले वीस लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील शहापूर या गावचे सागर विजय पाटील यांनी दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील केळीचे लागवड केलेली होती व योग्य निगा ठेवली व व्यवस्थापनाच्या सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण करून तंत्रज्ञानाच्या मदतीने केळीचे भरघोस उत्पादन मिळवले आहे.

त्यांनी जवळपास पावणेतीन एकरात चार हजार तीनशे उतिसंवर्धित म्हणजेच टिशू कल्चर रोपांची लागवड केलेली होती. व्यवस्थापन योग्य ठेवल्यामुळे दर्जेदार असे केळीचे उत्पादन त्यांना मिळाले. पिकवलेली केळी ही उच्च प्रतीची असल्यामुळे त्यांचा पावणे तीन एकर मधील बाग तब्बल वीस लाख एक हजार रुपयांना विकला गेला.

साधारणपणे त्यांनी लावलेल्या चार हजार तीनशे रोपांना म्हणजेच एका झाडाला 61 रुपये खर्च आला व त्यांना दोन लाख साठ हजार रुपये पावणे तीन एकर करिता खर्च करावा लागला. परंतु दर्जेदार केळीचे उत्पादन घेतल्यामुळे त्यांना त्यापासून आर्थिक उत्पन्न देखील चांगले मिळाले व 20 लाख रुपयांची कमाई करण्यामध्ये ते यशस्वी झाले.

एक आक्टोबर रोजी त्यांच्या या केळीची काढणी केली गेली व सागर पाटील यांनी चक्क केळीची भरलेली वाहने शेतातून वाजत गाजत थेट गावात आणली व वाहनांची मिरवणूक देखील काढली.

अशाप्रकारे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर जर केला तर कुठल्याही पिकाचे दर्जेदार उत्पादन मिळून शेतकऱ्यांना चांगला बाजार भाव मिळणे शक्य असते हे सागर विजय पाटील यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.

Ajay Patil