Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील प्रगतशील शेतकरी तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत मैनुद्दीन शेख यांनी आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड केली, या पिकास ठिबक सिंचनाव्दारे पाणी देऊन तब्बल ४ लाखांचे विक्रमी उत्पादन घेतले.
एका टरबुजाचे वजन १५ ते २० किलो भरत असून, व्यापारी शफीक भाई शेख व युसुफभाई पठाण यांनी हा माल खरेदी करून त्याची पंजाब, गुजरातमध्ये निर्यात करण्यात आली असल्याचे सांगितले. आंतरपिक घेतल्याने आणि ठिबक सिंचनने पाणी दिल्याने पाण्याची बचत होऊन शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज होऊन भरघोस उत्पादन होऊन पैसे मिळत असल्याचे तुषार वैद्य यांनी सांगितले.
शेती व्यवसाय हा निश्चित परवडतो, त्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती केल्यास व योग्य पद्धतीने पाणी व खताचा वापर केल्यास भरघोस उत्पन्न हमखास मिळते. आंतर पिकाबरोबर कमी कालावधीतील पिके घेण्याकडे तसेच कमी पाण्यावर ठिबकच्या सहाय्याने शेतकऱ्यांनी पिके घेण्यावर भर द्यावा. – मैनुद्दीन शेख, प्रगतशील शेतकरी, बालमटाकळी.
यावर्षी पाणीटंचाई असतानादेखील मल्चिग बेडवर ठिबकवर २ एकर मोसंबीच्या बागेत आंतरपीक म्हणून झेंडू, पपई, तसेच टरबुज हे पिके घेतली. सव्वादोन महिन्यातच दोन एकरात फक्त टरबुज या पिकाचे चार लाखांच्या आसपास उत्पादन मिळाले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून तंत्रशुद्ध पद्धतीने शेती व्यवसाय केल्यास निश्चितच शेती व्यवसाय परवडणारा आहे. – तुषार वैद्य, प्रगतशील शेतकरी तथा भाजपा तालुकाध्यक्ष, शेवगाव,