Marigold Farming :- शेतीमध्ये जर तुम्ही कल्पनाशक्तीचा वापर केला आणि त्याला जर आधुनिक तंत्रज्ञानाची आणि कष्टाची जोड दिली तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवता येणे शक्य आहे हे आपल्याला अनेक शेतकर्यांच्या उदाहरणावरून दिसून येते.
आता बरेच शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोचे उत्पन्न मिळवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. शेती करत असताना विविध प्रकारच्या पीक लागवडीचा प्रयोग तसेच त्या माध्यमातून घेतलेले भरघोस उत्पादन व यात महत्त्वाचे म्हणजे बाजारपेठेचा अंदाज घेऊन पिक लागवडीचे केलेले नियोजन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरताना दिसून येत आहे. अगदी या मुद्द्याला धरून जर आपण लातूर जिल्ह्यातील मोहगाव या गावचे शेतकरी सुग्रीव शिरसाठ यांची यशोगाथा पाहिली तर ती खरच इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहेच परंतु कमीत कमी क्षेत्रात जास्तीचे उत्पादन घेऊन लाखो रुपये कसे मिळवता येतात याचे ज्वलंत असे उदाहरण देखील आहे.
एका एकरमध्ये झेंडू लागवडीत केली कोबी पिकाची आंतरपीक म्हणून लागवड
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात असलेल्या मोहगाव या गावचे प्रयोगशील शेतकरी सुग्रीव शिरसाठ हे उच्चशिक्षित असून त्यांनी एम.ए, बीएड पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले आहे. परंतु उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी आधुनिक पद्धतींचा वापर करायचा ठरवला व त्यानुसार सगळ्या शेतीचे नियोजन केले.
यावर्षी त्यांनी एका एकर शेतीमध्ये जवळपास 5000 झेंडूच्या रोपांची चार बाय अडीच फुट अंतरावर ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी या झेंडू फुल पिकामध्ये आंतरपीक म्हणून कोबी या पिकाची निवड केली व कोबीची रोपे लावली. या दोन्ही पिकांचे अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थापन ठेवले आणि वेळेला खत नियोजन तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक फवारण्या केल्यावर त्यामुळे दोन्ही पिके चांगली बहरली.
झेंडूचे एक रोप त्यांना साडेतीन रुपयाला मिळाले व त्याकरिता त्यांना पन्नास हजाराचा खर्च आला व कोबीच्या लागवडीकरिता देखील 50 हजार रुपयांचा खर्च आला. त्यांचा झेंडूच्या फुलांची सध्या तोडणी सुरू आहे व आता दसरा सणा निमित्ताने तोडणी झाली व आता दीपावलीच्या निमित्ताने झेंडूची तोडणी सुरू करण्यात आलेली आहे.
सध्याचा झेंडूच्या फुलांचा बाजारपेठेतील दर पहिला तर तो 100 ते 150 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. अजून झेंडूचे उत्पादन सुरू असून साधारणपणे यातून 15 ते 20 क्विंटल उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. तसेच आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या कोबीला देखील सरासरी 15 ते 20 रुपये किलोचा दर बाजारपेठेत मिळत आहे. या एकरभर मधून जवळपास दोनशे क्विंटल कोबीचे उत्पादन निघण्याची अपेक्षा त्यांना आहे.
झेंडूच्या फुलांना मिळत आहे जास्तीचा दर
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे त्याचा फायदा अनेक पिकांना झाला आहे. तर काही पिकांचे मात्र नुकसान झालेले आहे. जास्त पावसामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन कमी झाले व त्यामुळे असलेली मागणी व त्यामानाने होणारा पुरवठा कमी असल्याने साहजिकच बाजारपेठेमध्ये झेंडूला चांगला दर मिळत आहे.
सुग्रीव शिरसाठ यांनी एक एकर शेतीचे योग्य नियोजन करून भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यांच्या शेतामध्ये आज केशरी आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूचे फुले तरारत असून त्या माध्यमातून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळाले आहे व अजून देखील मिळत आहे.