Agricultural News : पावसाचे तीन महिने उलटले, तरीही पुणे विभागात पुरेसा पाऊस झालेला नाही. उशिराने झालेल्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरण्या केल्या असल्या, तरी सध्या पावसाने मोठा खंड घेतल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. आठ दिवसांत पाऊस न पडल्यास सर्व पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
यंदा खरीप हंगामात पुणे विभागात सरासरीच्या १० लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी ११ लाख ८३ हजार ८२८ हेक्टर म्हणजेच, १११ टक्के पेरण्या झाल्या आहेत. परंतु, पावसाच्या तीन महिन्यांत ३९७ मंडलांपैकी १६४ मंडलांत २१ पेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये भात पिकांची ५९ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत भात पीक वाढीच्या अवस्थेत असून, पश्चिम भागात चांगल्या पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक आहे. जून महिन्यात पेरणी झालेले मूग पीक कापणीच्या अवस्थेत असून, पावसातील खंडामुळे शेंगांचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे.
नगरमध्ये खरीप हंगामातील भात पिकाची अकोले तालुक्यामध्ये १७ हजार ३९१ क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत भात पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असून, पाऊस लांबल्यामुळे भात पीक सुकत आहे. खरीप ज्वारी पीकवाढीच्या अवस्थेत असून, पाऊस लांबल्यामुळे पीके सुकून जात आहेत.
बाजरी पीक पोटरीच्या अवस्थेत असून, मका पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर, तूर पीकही फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. सोलापूर जिल्ह्यात मूग पीक फुलोरा अवस्थेत असून, पावसाअभावी पीक कोमेजलेल्या स्थितीत आहे.
मूग पिकाचा फुलोरा व कळी गळून जात आहे. उडीद पीक कोमेजलेल्या स्थितीत आहे. उडदाचा फुलोरा व कळी गळून जात आहे. सोयाबीन, बाजरी व तूर पिकेही कोमेजली आहेत.