भाव वाढतील या आशेने आजही ३० टक्के शेतकरी सोयाबीन घरातच साठवून ठेवून आहे. पण भाव काही वाढेना. ४ हजार ५०० च्या पुढे भाव सरकेना. अशातच आता खरीप हंगामात पेरणीसाठी ३० किलो सोयाबीन बियाणाला ३२०० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत.
तर पेरणी व काढणीपर्यंत १६ हजार एकरी खर्च येत आहे. त्यामुळे आता तुम्हीच सांगा काय शेतकरी वरी येईल, असा सूर हवालदिल शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. सोयाबीन पिकाचा उतारा एका बेंगला एकरी पाच ते सहा क्विंटल येतो. लागवड व इतर पूर्ण खर्च लावला तर शेतकऱ्यांना काहीच उरत नाही.
एक तर पिकाचा उतारा कमी आणि उत्पादित मालाला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे. सोयाबीनच्या पिकापोटी सर्व खर्च येतो १६ हजार तर २० हजार रुपये हातात येतात, काय उरते, मग तुम्हीच सांगा कसा काय शेतकरी वरी येईल? असे शेतकरी बोलून दाखवीत आहेत.
सालगडी ठेवणे झाले अवघड
– दिवसेंदिवस ही परिस्थिती कायम असल्याने कर्जाच्या खाईतच शेतकरी ढकलला जात आहे. सालगडी ठेवणे अवघड झाल्याने शेतकरी रोजंदारीवर शेतमजुरांकडून कामे करून घेतात त्यांच्याकडूनही आता अडवणूक होत आहे.
– शेतमजुरीचे दरदेखील मनमानीपणे वाढले आहेत. शेतकरी पेरणी, आंतरमशागती यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात. मात्र, पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. अनेकांनी शेती करणे सोडून दिले आहे.
एकरी सोयाबीन लागवडी पोटी येणारा खर्च या प्रमाणे
नांगरणी ११०० रुपये
रोटावेटर ८०० रुपये
पेरणी ८०० रुपये
बियाणे बॅग ३२०० रुपये
खत २५०० रुपये
फवारणी २५०० रुपये
सोयाबीन कापणी ३००० रुपये
मळणी यंत्रात काढणी २००० रुपये
एकरी खर्च जवळपास १६३०० रुपये खर्च येतो