Agricultural News : पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरशः जेरीस आले आहेत. ४० रुपयांपर्यंत गेलेले दुधाचे दर आता ३० ते ३१ रुपयांवर आले आहे. दुधाच्या दरात मोठी घसरण झाली असताना चाऱ्याचे व पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असल्याने दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गायी, म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे काही कुटुंबांचा उदारनिर्वाह दूध व्यवसायावर चालतो. दुधाच्या उत्पादन खर्चात यंदा मोठी वाढ झाली आहे.
पशुखाद्याचे दर सतत वाढत असल्याने पशुपालक शेतकरी अक्षरशः जेरीस आलेला असल्याने दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. हिरव्या चाऱ्यासह पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सद्यःस्थितीत मका व उसाचा हिरवा चारा तीन ते चार हजार रुपये टन, या दराने परिसरात मिळत आहे.
तर पन्नास किलोचे एक हजार तीनशे रुपयांना मिळणारे खाद्य आता एक हजार सातशे रुपयांपर्यंत मिळत आहेत. एकीकडे खाद्याचे दर वाढलेले असताना दुसरीकडे दूध दरात मात्र वेळोवेळी कपात होऊन दुधाचा दर ३० ते ३१ रुपयांपर्यंत झाला आहे.
शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी जवळचे पैसे खर्च केले तर काहींनी बँकेचे कर्ज व उसनवारीने पैसे घेऊन गायी, म्हशी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे जनावरे विकताही येईनात आणि ठेवताही येईनात, अशी अवस्था निर्माण झाली असतानाच लंपी या रोगाने थैमान घातले असल्याने त्यामुळे पशुपालक शेतकरी हैराण झाले आहेत.
पशुखाद्याचे दर वाढले असल्याने जनावरांना खाद्य शेतकऱ्यांना परवडत नाही, तरी चांगल्या प्रतीचे दूध मिळावे, म्हणून अधिक झळ सोसून शेतकरी जनावरांना खाद्य घालत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे.
सरकारने खाद्यावरील दर नियंत्रण करावे अथवा त्यावर अनुदान द्यावे, अशी मागणी कुकडी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन विश्वास थोरात यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.