Agricultural News : शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरीकडे गेल्या काही वर्षांपासून कल वाढला आहे. कमी कालावधी आणि कमी खर्चात हे पीक येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. यंदा शहरटाकळी परिसरात सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीचे पीक घेण्यात आले आहे.
या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जात आहे. निसर्गाचा कोप आणि वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नासाडीमुळे बाजरीचे पीक शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी परिसरात मागील काही वर्षापासून कमी झाले होते. असे असले तरी मागील तीन वर्षांपासून शेतकरी पुन्हा उन्हाळी बाजरीला प्राधान्य देत आहेत. यंदादेखील या भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे.
खरिपापाठोपाठ रब्बीतील पिके वर्षानुवर्षे निसर्ग हिरावून घेत आहे. शेती कसून कुटुंबीयांची गुजरण करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक दमछाक होत आहे. खरिपात कापूस, मूग, सोयाबीन, तूर, बाजरी तर रब्बीत गहू, हरभरा, ज्वारी, मूग, ही पिके शेतकरी घेतात.
मात्र, परिसरातील बहुतांशी क्षेत्र ओलितास आल्याने शेतकऱ्यांचा उन्हाळी भुईमूग, सोयाबीन, मूग आणि बाजरी ही पिके घेण्याचा कल मागील दोन-तीन वर्षापासून वाढलेला आहे. यात प्रामुख्याने शेतकरी उन्हाळी पिके घेत आहेत. परिणामी खरिपातील बाजरीचे पीक लोप पावत चाललेले आहे, पण या परिसरातील शेतकरी तीन वर्षांपासून उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात.
सध्या दोनशे हेक्टरच्या वर बाजरीचे पीक फुलोऱ्यात आलेले असून, पीक चांगलेच बहरात दिसत असल्याने खरीप रब्बी गेले तरी उन्हाळी बाजरी साथ देईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
उन्हाळी हंगामात साधारणपणे दोनशेहून अधिक हेक्टर क्षेत्रावर बाजरीचे पीक घेतले जात आहे. उन्हाळी हंगामात पाण्याच्या उपलब्धतेमुळे तसेच भरपूर सूर्यप्रकाशामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे उन्हाळी बाजरीचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. उन्हाळी हंगामात बाजरीचे उत्पादन चांगले व अधिक होते, संकरित वाणाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतो.
गतवर्षी उन्हाळी बाजरीचे एक एकर पीक घेतले असता वीस पोते बाजरीचे उत्पादन झाले. यंदादेखील दीड एकरावर उन्हाळी बाजरीचा पेरा केला आहे. बाबासाहेब पंडित.: शेतकरी, शहरटाकळी.