Avocado Crop Cultivation:- शेती आणि शेतीमधील तंत्रज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून शेतीमध्ये आता अतिशय प्रगत असे तंत्रज्ञान विकसित झाल्याने अनेक वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि त्यांचे उत्पादन शेतीमधून मिळवणे शक्य झाले. तसेच या इंटरनेटच्या युगामध्ये शेती विषयीची कुठलीही माहिती झटक्यात मिळू लागल्यामुळे देखील बराच मोठा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसून येतो.
तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहेत. आजकाल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे पाहायला मिळते व हा बदल प्रामुख्याने पीक लागवडीच्या बाबतीत देखील दिसून येतो.
यामध्ये पारंपारिक पिकांऐवजी आता शेतकरी विविध प्रकारच्या फळ पिकांची लागवड तसेच भाजीपाला पिके यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात आणि लाखो रुपये मिळवतात. भाजीपाल्यामध्ये देखील अनेक विदेशी भाजीपाला पिकांची लागवड महाराष्ट्रात आता होऊ लागली आहे व त्यासोबत काही विदेशी फळबागांची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे.
अगदी याच विदेशी फळाच्या बाबतीत जर आपण बघितले तर बीड जिल्ह्यातील शिवनी येथील अवघ्या बारावी पास शिक्षण झालेल्या शेतकऱ्याने ॲव्होकॅडो या विदेशी फळाची गुगलच्या माध्यमातून माहिती घेतली व त्याची लागवड करून आज लाखो रुपये उत्पन्न मिळवत आहे.
ॲव्होकॅडो फळ लागवडीतून हा शेतकरी एका एकरमधून मिळवत आहे दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील शिवनी येथील परमेश्वर आबासाहेब थोरात यांचे शिक्षण बारावी पास झालेले आहे व त्यानंतर त्यांनी कृषी डिप्लोमा केला. परंतु नोकरीच्या मागे न लागता घरच्या पाच एकर शेतीमध्ये काहीतरी करावे असा निर्णय त्यांनी घेतला.
परंतु त्यांची जी काही पाच एकर जमीन आहे ती सर्व मुरमाड आहे व अशा पद्धतीच्या मुरमाड जमिनीमध्ये उत्पन्न कोणते घ्यायचे हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. वेगवेगळ्या पिकांचा शोध घेत असताना त्यांना गुगलवर ॲव्होकॅडो या विदेशी फळाची माहिती मिळवली व या फळासंबंधीचे अनेक व्हिडिओ त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून बघितले.
हे सगळी माहिती मिळवून त्यांनी या फळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला व अमेरिका व बेंगलोर वरून 55 रोपे लागवडीकरिता मागवली व मुरमाड जमिनीमध्ये लागवड केली. आज त्यांच्या शेतामध्ये जवळपास ॲव्होकॅडोची 300 झाडे आहेत. या विदेशी पिकापासून त्यांना एकरी दहा लाखापेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे.
या फळाचे वजन साधारणपणे 200 ते 500 ग्रॅम पर्यंत असते व याला किलोला दोनशे ते पाचशे रुपये पर्यंत दर मिळतो. जर आपण ॲव्होकॅडोचे झाड बघितले तर ते साधारणपणे लिंबू किंवा मोसंबीच्या झाडाप्रमाणे दिसते. परंतु नंतर ते आंब्याच्या झाडासारखे होते व लागवड केल्यानंतर त्याचे आयुष्य जवळपास 50 वर्षे इतके असते.
लागवडीनंतर कधी मिळते उत्पादन?
या विदेशी फळपिकाची लागवड करण्याअगोदर जमिनीमध्ये शेणखत तसेच गांडूळ खत व रासायनिक खते टाकली जातात व जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या फळांची झाडे धुवून स्वच्छ केली जातात व गरजेनुसार कीटकनाशकाची फवारणी केली जाते.
याच कालावधीमध्ये या झाडांना फुले येतात व फळ लागल्यापासून ते काढणीपर्यंत सहा महिन्याचा कालावधी जातो. साधारणपणे जून ते जुलैमध्ये फळांची काढणी होते व वर्षातून एकाच वेळेस याचे उत्पादन मात्र घेता येते.
2021 मध्ये मिळाले होते त्यांना पहिले उत्पन्न
साधारणपणे परमेश्वर थोरात यांनी 2017 मध्ये काही विविध प्रकारच्या विदेशी पिकांची माहिती घ्यायला google च्या साह्याने सुरुवात केली होती व या शोधामध्ये त्यांना इस्रायलमधील ॲव्होकॅडो या विदेशी फळाची माहिती मिळाली व youtube वरून अभ्यास करून या फळाविषयी त्यांनी संपूर्ण माहिती मिळवली.
या फळाच्या लागवडी मागील फायदे तसेच तोटे व बाजारभाव इत्यादींची माहिती घेतली व लागवड करण्याचा निर्णय घेतला. याकरिता 2018 मध्ये त्यांनी बंगलोर येथून 50 झाडे आणली व 2021 साली त्यांना पहिले उत्पन्न मिळाले.
विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी सर्व खर्च जाऊन त्यांना तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर 2024 मध्ये त्यांनी एक एकरमध्ये 300 झाडे लावली व त्यांना सर्व खर्च जाऊन दहा लाख रुपये पेक्षा जास्त उत्पन्न त्यांना एकर मध्ये मिळत आहे.