कृषी

अहमदनगर मधील ‘हा’ शेतकरी आहे चंदनाचा मास्टर! केली आहे 14,000 चंदनाच्या झाडांची लागवड, कमाई आहे कोट्यावधीत

Published by
Ajay Patil

शेतीक्षेत्र आणि शेती करण्याच्या पद्धती यामध्ये आता आमुलाग्र बदल झाला असून केवळ उदरनिर्वाह करिता शेती ही संकल्पना कधीच मागे पडलेली आहे. त्याची जागा आता आधुनिक शेतीची पद्धत आणि फळपिके तसेच वेगवेगळ्या भाजीपाला पिकांपासून तर वेगवेगळ्या फायदेशीर अशा वृक्ष लागवडी पर्यंत ही पद्धत पोहोचलेली आहे.

शेतकरी आता शेतीमधून शाश्वत उत्पन्नाचे पर्याय शोधत असून त्या पद्धतीने बदल देखील करत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या जोडधंद्यांची जोड शेतीला देऊन  आर्थिक उत्पन्नामध्ये भर टाकण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

अशाच प्रकारचा शेतीतील बदल पाहिला तर अहमदनगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. या शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये आमुलाग्र बदल करत 27 एकर माळरानाच्या शेतीमध्ये इतर पिकांसोबत चंदनाची लागवड करून शेतीमध्ये आमुलाग्र असा बदल घडवून आणलेला आहे.

 राजेंद्र गाडेकर यांनी केली चंदनाची लागवड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांचे 27 एकर  माळरानावर शेती असून त्यामध्ये त्यांनी चंदनाची लागवड करून शेतीमध्ये व पिकपद्धतीत आमुलाग्र  बदल घडवून आणलेला आहे. जर चंदन लागवडी मागील त्यांची प्रेरणा बघितली तर आपल्याला काही वर्ष मागे जावे लागेल.

2014 यावर्षी दुष्काळ पडलेला होता व त्यामुळे शेतीची जी काही पारंपारिक पद्धत आहे त्यामध्ये मोठा आर्थिक फटका त्यांना बसला. तसे पाहायला गेले तर पारंपरिक शेतीमध्ये  पिकांसाठी करावा लागणारा खर्च आणि त्यातून निघणारे उत्पन्न यांचा कुठे ताळमेळ  बसत नसल्यामुळे शेतीत काहीतरी बदल करावा हे त्यांनी निश्चित केलेले होते.

कमीत कमी पाण्यात व कमीत कमी खर्चात शेती कसा करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केले व फळझाडे केंद्रित शेती करण्याचा निर्णय घेतला.

 अवलंब केला एकात्मिक पिक पद्धतीचा

राजेंद्र गाडेकर यांनी 27 एकरमध्ये एकात्मिक पिकपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांनी त्यांच्या 27 एकर शेतीमध्ये डाळिंब, संत्रा, सिताफळ, आवळा आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून चंदन लागवड अशी पीक पद्धत अवलंबली. हा प्रयोग त्यांनी यशस्वी केला व त्या माध्यमातून ते कोट्यावधीचा नफा मिळवत आहेत.

यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा कौशल्य पूर्ण रीतीने फायदा घेत 14000 सफेद चंदनाच्या झाडाची लागवड केली.  चंदनापासून ते अगरबत्ती तसेच तेल व पावडर असे अनेक उत्पादन तयार करून त्यांची विक्रीतून कोट्यावधी रुपयांचा नफा मिळवत आहे.

चंदनाच्या झाडाची वैशिष्ट्ये बघितले तर त्याला तीन वर्षांमध्ये बिया येतात व त्यांना चांगला दर मिळतो. त्यांनी चंदनाच्या झाडांचे व्यवस्थापन करताना चंदनाच्या झाडांची वाढ चांगली व्हावी म्हणून प्रत्येक चंदनाच्या झाडाजवळ एक कडुनिंबाच्या झाडाची लागवड केलेली आहे.

इतकच नाही तर चंदनाची चोरी होऊ नये म्हणून चंदनाच्या झाडांच्या सभोवती काटेरी वनस्पतींची लागवड केली आहे व त्यासोबतच सौर कुंपण देखील बसवलेले असून सुरक्षा व्यवस्था मजबूत उभारली आहे. चंदनाच्या माध्यमातून तर त्यांना आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

परंतु त्यासोबत एकात्मिक पिक पद्धतीमध्ये डाळिंब तसेच संत्रा व सीताफळ यासारख्या पिकांपासून देखील ते चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत. चंदनाची लागवड करण्यासाठी त्यांनी तामिळनाडू राज्यातील मदुराई येथून सफेद चंदनाची रोपे आणली व त्यांची लागवड केली.

त्यासाठी व्यवस्थापन करताना संपूर्ण ठिबक सिंचनाचा वापर केला व पाण्याच्या सोयीसाठी शेतात एक कोटी 75 लाख लिटर क्षमतेचे शेततळे देखील उभारले. चंदनाच्या झाडाला पाणी खूप कमी लागते. साधारणपणे एक आठवड्याचा विचार केला तर फक्त चार लिटर पाणी दिले तरी पुरेसे ठरते.

 इतर शेतकऱ्यांना देत आहेत मार्गदर्शन

जेव्हा गाडेकर यांनी चंदन शेतीतून स्वतः यश मिळवले आणि आर्थिक सुबत्ता प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील या दिशेने प्रेरित करण्याच्या उद्देशाने पावले उचलायला सुरुवात केली

व त्याचीच परिणीती म्हणून आज जवळपास परिसरातील 400 शेतकऱ्यांना चंदन शेतीची माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये गाडेकर हे नाव चंदन शेतीच्या दृष्टिकोनातून प्रकर्षाने ओळखले जाते.

Ajay Patil