Soybean Crop Cultivation:- कुठल्याही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर पिकांचे सर्व दृष्टिकोनातून व्यवस्थापन आणि प्रत्येक कामाचे वेळेत नियोजन करणे खूप गरजेचे असते. तसेच व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला तर भरघोस उत्पादन मिळणे शेतकऱ्यांना शक्य होते.
म्हणजेच एकंदरीत पाहता सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक पीक व्यवस्थापन या जोरावर शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगले उत्पादन घेऊ शकतात हे आपल्याला अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून दिसून येते. अगदी याच पद्धतीचे उदाहरण आपल्याला नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या मोहळांगी या गावच्या तानाजी चौरे यांचे घेता येईल.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुका म्हटले म्हणजे या ठिकाणी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये प्रामुख्याने मका आणि कांदा या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व लागवड देखील मोठ्या क्षेत्रावर असते. त्यातल्या त्यात बागलाण तालुका हा प्रामुख्याने कांदा उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जातो.
अशा या पट्ट्यामध्ये सोयाबीन लागवड आपल्याला शोधून देखील सापडत नाही अशी स्थिती आहे. परंतु याच बागलाण तालुक्यातील मोहळांगी येथील शेतकऱ्याने मात्र सुधारित तंत्रज्ञान आणि पीक व्यवस्थापनाच्या जोरावर तीन एकरमध्ये 63 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन घेत एक नवा आदर्श घालून दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले 3 एकरात 63 क्विंटल सोयाबीन उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बागलाण तालुक्यातील मोहळांगी या गावचे प्रगतिशील शेतकरी तानाजी रामदास चौरे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शन व आधुनिक सोयाबीन तंत्रज्ञानाचा वापर या जोरावर तीन एकर सोयाबीन लागवडीतून 63 क्विंटल उत्पादन घेतले आहे.
एकूण उत्पादनातून त्यांना तीन लाख 9 हजार 288 रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असून या तीन एकरसाठी त्यांना 59 हजार 130 रुपये खर्च आलेला होता व हा खर्च वजा जाता त्यांना अडीच लाख रुपयांचा निव्वळ नफा झालेला आहे. तसे पाहायला गेले तर तानाजी चौरे हे गेले कित्येक वर्षापासून सोयाबीनचे उत्पादन घेतात. परंतु अगोदर ते सोयाबीनचे जुने वाण जेएस 335 आणि 9305 या वाणाची लागवड करीत होते.
त्यानंतर त्यांनी कृषी विज्ञान केंद्र,मालेगाव यांच्याकडून मागील वर्षी फुले संगम हा सोयाबीनचा वाण घेतला व बागलाण येथून त्यांनी सोयाबीन टोकन मशीन खरेदी करून त्यानंतर चार फुटी गादीवाफ्यावर दोन ओळीत एक फुट अंतरावर टोकण पद्धतीने लागवड केली. अशा पद्धतीने लागवड करण्याकरिता त्यांना एका एकरकरिता 12 ते 13 किलो सोयाबीनचे बियाणे लागले.
लागवड करताना अशा पद्धतीने व्यवस्थापन केले होते की त्यांच्या भागामध्ये 800 ते 1000 मिलिमीटर पावसाचे प्रमाण असते. परंतु एवढ्या पावसात देखील पावसाची जास्तीचे पाणी सारीद्वारे बाहेर निघण्याचे व्यवस्थापन केल्यामुळे बराच फायदा झाला.
३० किलो वजनाच्या यांच्या बॅगेतून दोन एकरपेक्षा जास्त लागवड झाली.तसेच लागवड करताना अंतर जास्त ठेवल्यामुळे तणनाशक तसेच कीटकनाशक फवारण्यासाठी देखील योग्य व पुरेशी जागा मिळाली आणि दाट सोयाबीन असताना जे नुकसान व्हायचे ते नुकसान टळले.
लागवडीचे अंतर जास्त असल्यामुळे मोकळी व हवेशीर जागा उपलब्ध झाल्याने पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी व्हायला मदत झाली व फवारणी वरचा खर्च देखील कमीत कमी आला.
अशा पद्धतीने कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्याने साहजिकच उत्पादनात वाढ झाली. तसेच वेळोवेळी पीक व्यवस्थापन केले व निरीक्षणे घेतली व त्यानुसार पिकाचे नियोजन करणे सोपे गेले. तसेच कीटकनाशकांसोबत पिकवाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांची फवारणी केली व त्याचा नक्कीच फायदा त्यांना दिसून आला.
राज्यस्तरीय पिक स्पर्धेत मिळवला प्रथम पुरस्कार
मागील वर्षाच्या खरीप हंगामातील पिक स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून आदिवासी गटात तानाजी चौरे यांनी सोयाबीन पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम पुरस्कार पटकावला. या पुरस्काराचे स्वरूप बघितले तर यामध्ये सन्मानपत्र आणि रोख पन्नास हजार रुपये अशा पद्धतीचे होते.
यावरून आपल्याला दिसून येते की जर पिकाचे व्यवस्थापन करताना सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य पीक व्यवस्थापन ठेवले तर नक्कीच भरघोस उत्पादन मिळवणे शक्य होते.