कृषी

Custard Apple Farming: ‘या’ शेतकऱ्याने अडीच एकरमध्ये केली सीताफळाची लागवड! मिळेल 10 ते 12 लाखांचे उत्पन्न, वाचा प्रेरणादायी कथा

Published by
Ajay Patil

Custard Apple Farming:- फळबाग लागवड शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता खूप महत्त्वाची ठरताना दिसून येत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी क्षेत्रात घेऊन लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया शेतकऱ्यांनी साध्य केलेली आहे.

पारंपारिक शेतीची पद्धत आणि पारंपारिक पिके यांच्यामध्ये होणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा कुठल्याही प्रकारे ताळमेळ बसत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत व पर्यायाने कर्जबाजारी झाल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्रात आहे.

त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. त्यातल्या त्यात अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आता शेती व्यवसायाची निवड केल्यामुळे साहजिकच फळबाग लागवडीकडे या तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये आता बदल घडून येताना दिसत आहे.

याच मुद्द्याला धरून जर आपण जालना तालुक्यातील कडवंची या गावचे प्रगतिशील शेतकरी कृष्णा क्षीरसागर यांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी सिताफळ लागवड करून द्राक्ष बागेतून मिळणाऱ्या उत्पादनाला टक्कर देत लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य केली आहे.

 कृष्णा क्षीरसागर यांना सिताफळ लागवडीतून मिळणार लाखोत उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना तालुक्यातील कडवंची या गावचे प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित असणारे कृष्णा क्षीरसागर यांनी त्यांच्या शेतामध्ये सिताफळ लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून अगोदर ते द्राक्ष लागवडीतून द्राक्ष उत्पादन आणि त्यापासून मनुका तयार करणे अशा प्रकारचे त्यांचे शेतीचे स्वरूप होते.

द्राक्ष लागवडीसोबतच त्यांनी मोसंबी लागवड देखील केलेली होती. परंतु त्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी अडीच एकर मध्ये 900 सीताफळांचे झाडे लावली. सीताफळाचे योग्य व्यवस्थापन ठेवले व आतापर्यंत त्यांनी त्यांच्या शेतामध्ये द्राक्ष आणि मोसंबी बागेपासून जे काही उत्पन्न मिळवलेले होते त्यापेक्षा सिताफळ बागेतून त्यांना अधिकचे उत्पन्न  मिळाले.

यावर्षी त्यांना लावलेल्या अडीच एकर मधील 900 सीताफळांच्या झाडांपासून जवळपास 22 ते 25 टन उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. जर पन्नास रुपये प्रति किलो इतका बाजार भाव जर मिळाला तर दहा ते बारा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.

विशेष म्हणजे त्यांनी या अडीच एकर सिताफळ बागेकरिता दोन लाख रुपये इतका खर्च केलेला आहे.2018 यावर्षी त्यांनी सिताफळाची लागवड केलेली होती व लागवड केल्यापासून साधारणपणे तीन वर्षांनी सिताफळाला फळधारणा झाली. 2022 मध्ये पहिल्या तोडणीतच त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

त्यानंतर मात्र मिळणाऱ्या उत्पन्नाचा आलेख हा चढता राहिला व दुसऱ्या वर्षी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले व तिसऱ्या वर्षी पाच लाखावरून उत्पन्नाचा आकडा तब्बल साडेनऊ लाख रुपयांवर पोहोचला. हे चौथे वर्ष असून यावर्षी 12 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे.

Ajay Patil