Blue Rice Farming:- आधुनिक शेती पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर याच्या बळावर शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारचे पिके महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. अगदी आपण पाहिले तर विदेशी भाजीपाल्यापासून तर इतर विदेशी पिकांपर्यंत यशस्वी लागवड आणि उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी आता हातखंडा मिळवला आहे.
ब्रोकोली, झुकिनी सारख्या विदेशी भाजीपाला, सफरचंदासारख्या फळ पिकाची महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे लागवड आणि उत्पादन घेण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करताना आपल्याला सध्या दिसून येत आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या चिखलगाव येथील लहू मारुती फाले या शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी खरीप हंगामामध्ये मलेशियाच्या निळ्या तांदुळाची यशस्वीपणे लागवड करून उत्पादन देखील घेतले आहे.
प्रामुख्याने थायलंड आणि मलेशिया सारख्या देशात उत्पादित होणारा या तांदळाची लागवड महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्यात या शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवली आहे. याच शेतकऱ्याची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
मुळशी तालुक्यात निळ्या तांदळाची शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे जिल्ह्यात असलेल्या मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील शेतकरी लहू मारुती फाले यांनी खरीप हंगामामध्ये थायलंड आणि मलेशिया या देशात उत्पादित होणाऱ्या निळ्या तांदळाची शेती यशस्वी केली असून या तांदळाचा रंग निळसर गडद जांभळा असतो. फाले यांनी मुळशी भागामध्ये हा तांदूळ उत्पादित करण्याचा हा प्रयोग यशस्वी केला असून त्यामागे त्यांना तालुका कृषी अधिकारी हनुमंत खाडे व कृषी सहाय्यक शेखर विरनत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे.
सध्या ते या भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून इतर शेतकऱ्यांनी देखील या भाताची लागवड करावी व ज्यांना या भाताची लागवड करायची आहे त्यांना ते मार्गदर्शन देखील करत आहेत. जर आपण निळ्या तांदळाच्या या पिकाचे वैशिष्ट्य पाहिले तर याची उंची साधारणपणे सात फुटांपर्यंत होत असते.
तसेच लागवडीनंतर हा भात 110 ते 120 दिवसात काढणीस तयार होतो. एका एकर मध्ये 1600 किलो पर्यंत याचे उत्पादन मिळणे शक्य आहे. जर आपण बाजारपेठेत या तांदळाचा बाजार भाव पाहिला तर प्रति किलोला 250 रुपये इतका मिळतो.
निळ्या तांदुळाला बाजारपेठेत का असते जास्त मागणी?
या तांदुळामध्ये लोह, झिंक, अँटिऑक्सिडंट असल्यामुळे हा तांदूळ मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी खूपच फायद्याचा आहे. तसेच हृदयरोग आणि ज्यांना कर्करोगासारख्या आजारांनी ग्रासलेले आहे अशा रुग्णांसाठी देखील हा गुणकारी मानला जातो. निळ्या तांदुळामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असल्याने हा तांदूळ खरेदी करण्यासाठी शहरातील ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर या तांदुळाला पसंती देतात.