Farmer Success Story:- महाराष्ट्र मध्ये गेल्या काही वर्षापासून फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल वाढल्याचे दिसून येत असून यामध्ये डाळिंब, पेरू, द्राक्ष, सिताफळ, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी या व इतर फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करू लागले आहेत.
त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील बरेच शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि उच्च व्यवस्थापनाच्या माध्यमातून निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेताना आपल्याला दिसून येत आहेत.यामध्ये डाळिंब या फळाचा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये डाळिंबाच्या क्षेत्रात घट झाल्याची स्थिती होती व यामागे प्रामुख्याने डाळिंब बागेवर आलेल्या मर व तेल्या रोगामुळे अनेक बागा शेतकऱ्यांना काढून टाकावे लागल्या.
परंतु त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा डाळिंब लागवडीकडे मोर्चा वळवला व दर्जेदार उत्पादन घेण्यात देखील बरेच शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे.
अगदी याच पद्धतीने आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावच्या प्रगतिशील शेतकरी दीपक देशमुख यांनी तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनाच्या मदतीने भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड करून यशस्वी उत्पादन घेतले व एवढेच नाही तर कष्टाने पिकवलेला डाळिंब चक्क रशियाला निर्यात केला.
बनपुरी येथील डाळिंब रशियाला निर्यात
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आटपाडी तालुक्यातील बनपुरी या गावचे प्रगतीशील शेतकरी दीपक देशमुख हे गेल्या सहा सात वर्षांपासून डाळिंब पीक घेत असून योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ते दर्जेदार उत्पादन घेतात.
परंतु या वर्षी मात्र दर्जेदार डाळिंबाला रशियामध्ये खूप मागणी आहे. दीपक देशमुख यांनी अडीच एकर मध्ये डाळिंबाची लागवड केली असून यामध्ये त्यांनी 800 डाळिंबाचे झाडांची लागवड केली आहे. या झाडांच्या माध्यमातून त्यांनी कष्ट व शेतीच्या जोरावर दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले व त्या डाळिंबाला 118 रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे.
सध्या जर आपण बाजारपेठेतील डाळिंबाचे सर्वसाधारणपणे दर पाहिले तर ते 50 ते 90 रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहेत. दीपक देशमुख यांच्या बागेतील डाळिंबाच्या झाडांना मोठ्या प्रमाणावर डाळिंब लगडलेले असून एका झाडाला साधारणपणे 20 ते 25 किलो उत्पन्न निघण्याचा देखील त्यांना अंदाज आहे.
नियोजन व्यवस्थित ठेवून कमी खर्चात दर्जेदार उत्पादन निघाल्यामुळे त्यांना उच्चांकी दर देखील मिळाला व यामुळे ते पूर्णपणे समाधानी आहेत.
जिल्ह्यातून पहिल्यांदाच रशियात डाळिंबाची निर्यात
रशियामध्ये निर्यात करायचे असेल तर त्या ठिकाणी असलेल्या अनेक कसोट्यांवर डाळिंबाचा दर्जा तपासला जातो व त्यामुळेच आतापर्यंत डाळिंबाची निर्यात रशियात केली जात नव्हती.
परंतु आटपाडी तालुक्यातील दीपक देशमुख या प्रयोगशील शेतकऱ्याने मात्र जिद्द व चिकाटीच्या जोरावर गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेतले व डाळिंबाची रशिया देशात मागणी करण्यास भाग पाडले.
दीपक देशमुख यांचा डाळिंब यशस्वीपणे रशियाला निर्यात झाल्यामुळे आता तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना देखील याकामी प्रोत्साहन मिळाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात डाळिंब लागवड क्षेत्रात वाढ होऊन त्या अनुषंगाने डाळिंबाची निर्यात वाढेल यात मात्र शंका नाही.