Poultry Farming:- अनेक व्यक्तींच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असते व इच्छा पूर्ण करण्याची जर तळमळ आणि त्यासाठी लागणारे कष्ट करण्याची तयारी असेल तर कुठलीही गोष्ट शक्य होत नाही हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून दिसून येते.
अशी उदाहरणे आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतात व ती शेती क्षेत्रामध्ये देखील आहेत. काहीतरी करण्याची इच्छा असली तर अनेक अनुकूल परिस्थिती नसताना देखील व्यक्ती असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी होतात.
हिच बाब तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडीतील नवनाथ वळसे या तरुणाला लागू होते. विशेष म्हणजे या तरुणाकडे एक गुंठा देखील शेती नाही व शिक्षण देखील नाही. तरी देखील भाड्याने जागा घेतली व पत्र्याचे शेड उभारून गावरान कोंबडी पालन व्यवसाय सुरू करून लाखोंची उलाढाल करत आहे.
गावरान कोंबडी पालनातून वर्षाला सात लाखांची उलाढाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथील नवनाथ वळसे या तरुणाचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेले आहे व स्वतःच्या नावावर एक गुंठा देखील जमीन नाही.
परंतु व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने व त्याकरिता काहीही करण्याची तयारी असल्यामुळे दहा गुंठे भाड्याने जागा घेतली व त्या ठिकाणी पत्रांचे शेड उभारून गावरान कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला. जिद्दीने व्यवसायाला सुरुवात केली व जवळपास चार वर्षांपूर्वी त्यांनी माळरानावर दहा गुंठे जमिनीवर पत्रांच्या शेडमध्ये गावरान कोंबडीपालन व्यवसाय सुरू केला
व त्याच ठिकाणी गावरान अंडी उबवून त्यातून पिल्लांची निर्मिती देखील सुरू केली. अंडी उबवण्याकरिता आधुनिक इलेक्ट्रिक मशीन खरेदी करून त्यामध्ये एकाच वेळी 400 गावरान अंड्याची उबवणूक ते करतात. ही अंडी एकवीस दिवस या मशीनमध्ये ठेवल्यानंतर या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात.
अशा पद्धतीने केली सुरुवात
अंडी उबवण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिक मशीन आणि इतर गोष्टींसाठी एकूण दोन लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी यामध्ये केली. यामध्ये या अंड्यातून जन्माला आलेल्या पिल्लांचे ते संगोपन करतात व जेव्हा ते मोठे होतात
तेव्हा त्यांची विक्री ही साधारणपणे साडेचारशे रुपयांमध्ये कोंबडी आणि सहाशे रुपये दराने कोंबडा अशा पद्धतीने करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून ते वर्षाला सात लाख रुपये पर्यंत आर्थिक उलाढाल करतात व साडेतीन लाख रुपयांचा निव्वळ नफा वर्षाला मिळवत आहेत.
अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून लाखात नफा मिळवण्यामध्ये त्यांनी यश मिळवले आहे.ना शिक्षण, ना गुंठाभर जमीन तरी देखील जिद्द आणि मेहनतीने नवनाथ वळसे यांनी गावरान कोंबडी पालनातून आर्थिक स्वयंपूर्णता मिळवली आहे.