वारंवार शेतीवर धडकणारे नैसर्गिक आपत्तीचे संकट आणि त्यामुळे शेती पिकांचे होणारे अतोनात नुकसान यामुळे शेतकरी पुरते मेटाकुटीला आले असून शेतकऱ्यांचे पार आर्थिक दृष्टिकोनातून कंबरडे मोडल्याची स्थिती आहे.
त्यामुळे शेतकरी आता या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी विविध पद्धतीच्या नवनवीन पीक पद्धती आणि पारंपारिक पिकांऐवजी विविध प्रकारचे फळ पिके आणि भाजीपाला पिकांच्या लागवडीतून आर्थिक उन्नती साधताना आपल्याला दिसून येत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि योग्य व्यवस्थापनाने शेतकरी आता कमीत कमी क्षेत्रात देखील फळबाग लागवड करून लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया साध्य करत आहेत. याच पद्धतीने जर आपण हिमायतनगर येथील तरुण शेतकरी धनंजय तुप्तेवार यांची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे.
17 एकरमध्ये फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर येथील तरुण शेतकरी धनंजय गोविंद तुप्तेवार यांनी अथक परिश्रमातून सतरा एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली आणि बहरवली आहे. विशेष म्हणजे युट्युब वरून त्यांनी ड्रॅगन फ्रुट शेती विषयीची संपूर्ण माहिती मिळवली व क्षेत्रातील नामांकित तज्ञांकडून अनमोल मार्गदर्शन घेतले व त्यांच्यानुसार ड्रॅगन फ्रुट लागवडीचा निर्णय घेतला.
त्या आधी मात्र त्यांनी या विषयीचे संपूर्ण माहिती घेत संपूर्ण व्यवस्थापनाच्या पद्धती जाणून घेतल्या व 2017 मध्ये पाच एकर क्षेत्राची लागवडीसाठी निवड केली व यामध्ये ते योग्य व्यवस्थापन करून यशस्वी देखील झाले.
अगोदर लागवड केलेल्या पाच एकर क्षेत्रातील ड्रॅगन फ्रुट यशस्वी झाल्यानंतर त्यांनी 13 एकरमध्ये विदेशी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली व त्याचे व्यवस्थापन संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने करण्याचे निश्चित केले. त्यामध्ये देखील त्यांनी यश मिळवले व 13 एकर वरून ड्रॅगन फ्रुटच्या लागवड क्षेत्रात 20 एकर पर्यंत वाढ केली.
शेततळ्याच्या माध्यमातून केले पाणी व्यवस्थापन
ड्रॅगन फ्रुट हे तसे कमी पाण्यावर येणारे फळपीक असून त्याला कमीत कमी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ड्रिप इरिगेशनचा वापर करून जर पाणी व्यवस्थापन केले तर खूप मोठा फायदा होतो.
कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांनी दोन शेततळ्यांचा लाभ मिळवला आहे व या दोन्ही शेततळ्यांची पाणी साठवण करण्याची क्षमता दोन कोटी तीस लाख लिटर असून पैनगंगा नदीवरून थेट पाईपलाईन टाकून थेट पाणी हे शेततळ्यांमध्ये त्यांनी आणून साठवलेले आहे.
एकदा लागवड केली तर तब्बल मिळते 25 ते 35 वर्ष उत्पादन
ड्रॅगन फ्रुटची लागवड तुम्ही एकदा केली की त्यापासून 25 ते 35 वर्षानंतर उत्पादन मिळत राहते. धनंजय यांच्या शेतामध्ये सध्या ड्रॅगन फ्रुटचे पीक बहरले असून त्यापासून त्यांना भरघोस उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. ड्रॅगन फ्रुटची विक्री साधारणपणे विविध जिल्ह्यांच्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते
व त्यासोबतच पुणे तसेच हैदराबाद आणि बेंगलोरमध्ये देखील त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. गेल्या तीन वर्षापासून त्यांचे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सुरू असून मुंबई आणि बेंगलोरचे व्यापारी थेट शेतातून त्यांचे हे ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेऊन जातात तेथून ते विदेशामध्ये व अन्य राज्यांमध्ये पाठवले जाते.