कृषी

कापसाचे एकरी मिळवायचे असेल भरघोस उत्पादन तर फॉलो करा ‘या’ 20 टिप्स! मिळेल लाखात उत्पन्न

Published by
Ajay Patil

कुठल्याही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर लागवडीच्या पूर्वनियोजनापासून तर काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर व्यवस्थापन चोख ठेवणे खूप गरजेचे असते. तरच भरघोस उत्पादन मिळू शकते. अगदी हीच बाब कपाशी पिकाच्या बाबतीत देखील लागू होते. महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामात कपाशी पिकाची लागवड केली जाते.

बहुतांशी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्याने कपाशी पिकाचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे कपाशीची गुणवत्ता टिकवून ठेवायचे असेल तर या पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवस्थित नियोजन करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे या लेखात आपण अशा काही महत्त्वाचे मुद्दे बघू जे अवलंबल्याने कापूस पिकापासून भरघोस उत्पादन मिळू शकते.

 कापूस पिकाचे अशा पद्धतीने करा नियोजन मिळवा भरघोस उत्पादन

1- कपाशी पिकाच्या लागवडीसाठी मे महिन्यामध्ये जमीन मशागतीवर भर देणे गरजेचे आहे. कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी तसेच बागायती कपाशी लागवडीसाठी अगोदरचे पीक काढल्यानंतर लगेच 20 ते 25 सेंटीमीटर खोलवर नांगरणी करून घ्या.

2- नांगरणी झाल्यानंतर  उभी व आडवी वखरणी करून मशागतीची कामे उताराला आडवी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतामध्ये हेक्‍टरी 12 ते 15 गाड्या कूजललेले शेणखत व बागायती लागवडीसाठी 20 ते 25 गाड्या कुजलेले शेणखत चांगले पसरवून टाकावे.

3- तसेच कपाशी पिकाकरिता आवश्यकतेनुसार बीटी तसेच सुधारित व सरळ वानांची बियाणे, रासायनिक खते तसेच बीजप्रक्रियेसाठी लागणारी जिवाणू कल्चर व इतर बुरशीनाशकांची मॅनेजमेंट म्हणजे जुळवाजवळ करून ठेवणे गरजेचे आहे.

4- ठिबक सिंचनावर कपाशी घ्यायची असेल तर ठिबक संचाची मांडणी तसेच विद्राव्य खत संचाचे योग्य नियोजन करून ठेवावे.

5- बोंड आळी चा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर पूर्व हंगामी कपाशीची लागवड करू नये.

6- बागायती कपाशीची लागवड करायची असेल तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व कोरडवाहू कपाशीची मान्सूनच्या पेरणीयोग्य तीन ते चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. 15 जुलै नंतर कापसाची लागवड करू नये.

7- मागच्या वर्षी जर शेतामध्ये सोयाबीन, मुग तसेच उडीद व तूर सारखे पिके घेतली असतील तर एक फेरपालट म्हणून कपाशी लागवड करणे गरजेचे आहे.

8- कोरडवाहू बीटी कपाशीकरिता प्रामुख्याने 120 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. तर बागायती लागवडी करिता 150 बाय 30 सेंटिमीटर किंवा 180 बाय 30 सेंटिमीटर अंतर ठेवल्यास फायदा होतो.

9-कपाशी लागवड करताना चवळी, मका तसेच झेंडू इत्यादी सापळा पिकांची लागवड कापूस पिकासभोवती एक ओळ किंवा खाडे झालेल्या ठिकाणी टोकन पद्धतीने करावी.

10- अतिरिक्त आर्थिक उत्पन्न हवे असेल तर मध्यम ते भारी जमिनीमध्ये शिफारसीनुसार आंतरपीक पद्धती अवलंबवावी. यामध्ये तुम्ही कापूस अधिक मूग(1:1) किंवा कापूस अधिक उडीद(1:1) किंवा लवकर येणाऱ्या सोयाबीन जाती या पद्धतीच्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

11- कपाशी लागवड करताना नॉन बीटी बियाण्याची लागवड कपाशीच्या सभोवताली करणे गरजेचे आहे. जर नॉन बीटी कपाशीची लागवड करायची असेल तर गाऊचो या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया तीन ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात करावी.

12- कोरडवाहू बीटी वानांकरिता 60 किलो नत्र, 30-30 किलो स्फुरद आणि पालाश प्रती हेक्टर आणि बागायती कपाशी करिता 120 किलो नत्र आणि 60-60 किलो स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र पेरणीनंतर तीस दिवसांनी द्यावे. बागायती कपाशीमध्ये नत्राचा पुरवठा तीन वेळेस विभागून द्यावा.

13- तण नियंत्रणांमध्ये जर बघितले तर कपाशीमध्ये पीक व तन स्पर्धेचा कालावधी हा कपाशी लागवडीपासून 60 दिवसांपर्यंत असतो. त्यामुळे पेरणीपासून दोन महिन्यांपर्यंत पिक तणमुक्त ठेवावे.

14- कपाशी करिता उगवणीपूर्वी वापरायचे तणनाशक पेंडीमिथालीन 0.785 किलो ग्रॅम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी मात्र अडीच लिटर प्रति हेक्टर किंवा 25 ते 30 मिली प्रति दहा लिटर पाणी घेऊन बियाणे उगवणीपूर्वी फवारणी करून घ्यावी. त्यामुळे द्विदल वर्गीय तणांचे चार आठवड्यापर्यंत चांगले नियंत्रण मिळते.

15- कपाशी उगवल्यानंतर पायरीथायोबॅक सोडियम 62.5 g क्रियाशील घटक प्रति हेक्‍टरी मात्रा 600 मिली प्रति हेक्टर किंवा बारा मीली प्रति दहा लिटर पाणी करून फवारावे यामुळे द्विदल वर्गीय तणांचे नियंत्रण मिळते. त्यानंतर क्यूझॉलफॉप इथाईल 50.0 ग्राम क्रियाशील घटक प्रति हेक्टरी मात्र 500 मिली प्रति हेक्टर किंवा दहा मिली प्रति दहा लिटर पाणी घेऊन फवारावे व यामुळे एकदल वर्गीय तणांचे नियंत्रण होते.

16- तसेच कपाशी पिकाचा पाते तसेच फुले लागणे, बोंडे लागणे व भरणे या अवस्थेत सिंचनाची व्यवस्थित काळजी घ्यावी. या कालावधीत पाण्याची सर्वाधिक गरज असते.

17- पिकाची फुले तसेच पाते व फुलगळ थांबवण्याकरिता एन.ए.ए. या संजीवकाची तीन मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात दोन ते तीन आठवडाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी व फवारणी करताना यामध्ये कुठल्याही प्रकारचे रसायन मिक्स करू नये.

18- आठवड्यातून एका वेळा कपाशीतील 12 ते 14 झाडांचे निरीक्षण करावे.

19- रस शोषक किडींच्या योग्य व्यवस्थापनाकरिता पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर करणे गरजेचे आहे.

20- बोंडअळीच्या सर्वेक्षणाकरिता दोन कामगंध सापळे प्रति एकर शेतामध्ये उभारणे गरजेचे आहे व नर पतंग मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रणात आणायचा असेल तर हेक्‍टरी 20 कामगंध सापळ्यांचा वापर करावा.

Ajay Patil