Farmer Success Story:- शेती क्षेत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून अशा शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला मिळतात. अनेक शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपारिक पिकांऐवजी वेगवेगळ्या पिकांची लागवड करून कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे.
शेती क्षेत्र दिवसेंदिवस बदलत असून यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे आणि विशेष म्हणजे अनेक पिकांच्या दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जाती देशातील कृषी विद्यापीठ तसेच कृषी संशोधन संस्थांच्या माध्यमातून विकसित केल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होताना आपल्याला दिसून येतो.
अगदी याच शेती क्षेत्रासंबंधी जर आपण बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यात असलेल्या सिंगारपूर या गावचे रहिवासी पंकज साह या शेतकऱ्याची यशोगाथा पाहिले तर यांनी देखील शेतीमध्ये बदल करत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणाऱ्या गहू आणि तांदूळ या पिकांपेक्षा स्ट्रॉबेरी पिकाकडे स्वतःचा मोर्चा वळवला आणि त्यामध्ये ते यशस्वी ठरले.
स्ट्रॉबेरी शेतीतून मिळवलेला लाखो रुपयांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील जमुई जिल्ह्यात असलेल्या सिंगारपूर या गावच्या रहिवासी असलेले पंकज साह यांनी शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली व त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळवला आहे.
फक्त एक एकर क्षेत्रामध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे व वर्षभरात त्यांना 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पंकज यांचा विचार केला तर ते शेतकरीच आहेत व गहू आणि तांदळासारखे पारंपरिक पिकांची शेती अगोदर ते करत होते.
परंतु 2020 मध्ये त्यांनी टीव्हीवर एक व्हिडिओ पाहिला व त्या माध्यमातून त्यांना स्ट्रॉबेरी शेतीची माहिती मिळाली. मग त्यांनी निश्चय केला की शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करावी व याकरिता त्यांनी योग्य त्या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याचे ठरवले व प्रशिक्षण देखील घेतले.
त्यानंतर मात्र मागे वळून न पाहता 2020 पासून ते सातत्याने स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. ते पिकवलेली स्ट्रॉबेरीची विक्री घाऊक बाजारात करतात व उत्तर प्रदेशातून तसेच महाराष्ट्रातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
बारा महिन्यात चोवीस लाखांचा नफा मिळवला
पंकज साह यांनी या स्ट्रॉबेरी शेतीची माहिती देताना म्हटले की, स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी फळधारणा होते व या फळांची काढणी करून बाजारात विक्री करता येते. हे जुने पीक अनेक वेळा काढणी करून बाजारामध्ये विकणे शक्य आहे.
पंकज हे तीन महिन्याच्या हंगामामध्ये सहा ते सात लाख रुपयांचा व्यवसाय करतात एका वर्षामध्ये जवळपास तीन ते चार वेळेस स्ट्रॉबेरीची लागवड करता येणे शक्य आहे.
स्ट्रॉबेरी पिकातून त्यांना आतापर्यंत 24 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाल्याचे देखील त्यांनी सांगितल. एवढेच नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये स्ट्रॉबेरीच्या लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या बाबतीत देखील त्यांची तयारी सुरू आहे.
अशा पद्धतीने पारंपारिक पिकांऐवजी बाजारपेठेचा कल ओळखून जर नवनवीन पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच चांगला पैसा मिळू शकतो हे पंकज यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.