Success Story:- आजकाल आपण पाहतो की अनेक उच्चशिक्षित तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतात. परंतु अशा प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये त्यांचे मन लागत नाही व मनामध्ये दुसरे काहीतरी करण्याची इच्छा असते व ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
त्यामुळे ते अशा नोकऱ्यांना रामराम ठोकतात व मनात असलेल्या एखादा व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येतात व व्यवसाय उभारणी करून यशस्वी देखील होतात. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक तरुण आता शेतीमध्ये उतरत असून शेती
व शेतीशी संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जोड व्यवसाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक दृष्टिकोन समोर ठेवून करताना दिसून येत आहेत व त्यामध्ये यशस्वी देखील झालेले आहेत.
अगदी याचपद्धतीने जर आपण बिहारच्या पाटणा येथील रहिवासी असलेल्या जकी इमाम या तरुणाची यशोगाथा पाहिली तर त्याने दुबई आणि ओमान यासारख्या ठिकाणी नोकरी केली. परंतु त्या ठिकाणची नोकरी कोरोना कालावधीत सोडून त्याने मधाचा व्यवसाय म्हणजेच मधमाशी पालन सुरू केले व यामध्ये तो आज यशस्वी ठरलेला आहे.
मधमाशी पालनातून महिन्याला लाखोंची कमाई
बिहार राज्यातील पाटणा येथील रहिवासी असलेल्या जकी इमाम याचा भाऊ फजल इमाम याने बिहार सरकारच्या स्टार्टअप धोरणाची मदत घेऊन इमाम ब्रदर्स कंपनीच्या नावाने एक स्टार्टअप सुरू केलेला आहे व या कंपनीचा संचालक जकी आहे.
ही कंपनी साधारणपणे दोन वर्षापासून मध व्यवसायाशी संबंधित असून विविध प्रकारचे मध गोळा करण्यासोबतच अनेक प्रकारचे मधापासूनचे पदार्थ देखील या माध्यमातून बनवले जात आहे. जर आपण जकी इमाम याचा विचार केला तर तो दुबई आणि ओमान मध्ये केमिकल इंजिनिअर म्हणून काम करत होता.
पाच वर्षे दुबईत काम केल्यानंतर कोरोना कालावधीत तो घरी आला व घरी आल्यानंतर मधाच्या व्यवसायामध्ये त्याने काम करायला सुरुवात केली. परंतु कोविडचा कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा ओमान या ठिकाणी गेला व त्या ठिकाणी दोन महिने काम करून परत घरी आला.
घरी आल्यानंतर मात्र त्याने मधाचा व्यवसाय सुरू केला व 2022 या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये स्टार्टअप म्हणून मधाचा व्यवसाय सुरू करण्यात आला. त्यांच्या या स्टार्टअपला बिहार सरकारच्या उद्योग विभागाकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून आता नऊ महिन्याच्या कालावधीत त्यांचे कंपनीचे मूल्य 40 लाखांवर पोचले आहे.
करत आहेत मधाच्या संबंधित अनेक उत्पादनांची निर्मिती
मधाच्या क्षेत्रात अनेक प्रकारचे कामे करता येऊ शकतात असे देखील इमाम यांनी सांगितले. ते शेतकऱ्यांकडून ब्लॅकबेरी, तुळस, लिची आणि ड्रमस्टिकपासून मिळणारे मध विकत घेतात. एवढेच नाही तर अतिरिक्त पदार्थ देखील त्यापासून बनवले जातात.
उदाहरणच घ्यायचे झाले तर मुरंबा मध्ये आवळा साखरे ऐवजी मध घालून बाजारात ते विकतात. तसेच आले मधात आणि हळद मधात मिसळून देखील विक्री केली जाते. या कंपनीच्या माध्यमातून ते अनेक प्रकारचे हर्बल उत्पादने बाजारामध्ये उपलब्ध करून देत आहेत.
सध्या जकी इमाम यांच्यासोबत 50 पेक्षा जास्त शेतकरी काम करत आहेत व या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी कित्येक लोकांना रोजगार देखील दिलेला आहे.
दुबई आणि ओमान या विदेशाच्या ठिकाणी त्यांना प्रतिमाह दीड लाख रुपये इतकी पगार मिळत होती परंतु मध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना तब्बल तीन लाखापेक्षा अधिक नफा मिळत आहे.