शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती पद्धती विकसित झाल्यामुळे आता शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारचे उत्पादन घेण्यामध्ये शेतकरी यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर, वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून अगदी औद्योगिक क्षेत्राप्रमाणे आता शेतीचे मॅनेजमेंट शेतकरी करत आहेत.
अगदी त्याच पद्धतीने आपण जर उत्तर प्रदेश मधील एका फार्मचा विचार केला तर हा आशिया खंडातील सगळ्यात मोठा सिताफळाचा फार्म म्हणून ओळखला जातो. या फार्मचे नाव जे एस फार्म असे असून 2005 मध्ये अनिल शर्मा आणि वजीर लोहान यांनी सुरू केला. हा फार्म तब्बल 400 एकर क्षेत्रामध्ये असून या चारशे एकर क्षेत्रामध्ये 16 प्रकारचे फळबाग लागवड करण्यात आलेली आहे.
चारशे एकरमध्ये केली जाते शेती
जर आपण या ठिकाणाचा विचार केला तर या ठिकाणी दुष्काळी पट्टा असल्यामुळे जमिनीचा वापर हव्या त्या प्रमाणात करण्यात येत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी अनिल शर्मा व वजीर लोहान यांनी जमिनी खरेदी करायला सुरुवात केली. साधारणपणे हे वर्ष होते 2005 व त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी या संपूर्ण क्षेत्रामध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. नंतर या संपूर्ण चारशे एकर क्षेत्रामध्ये त्यांनी 16 प्रकारच्या फळबागांची लागवड केली. विशेष म्हणजे या ठिकाणी 180 एकर क्षेत्रावर सीताफळ लागवड करण्यात आलेली असून हा आशिया खंडातील सर्वात मोठा सिताफळचा फार्म आहे.
एवढेच नाही तर तीस एकर मध्ये ड्रॅगन फ्रुट लागवड करण्यात आलेली असून हा देखील भारतातील ड्रॅगन फ्रुटच्या बाबतीत बाबतीत मोठा फार्म आहे. सोबतच पेरू, दशहरी आंब्याची लागवड 25 एकर मध्ये करण्यात आलेली आहे. त्यासोबतच चिकू, लिंबू तसेच मोसंबी इत्यादी सोळा प्रकारचे फळ पिकांची लागवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण आंब्याची लागवड पाहिली तर ती अतिसघन लागवड पद्धतीने करण्यात आलेले आहे. कारण यामध्ये त्यांचे तत्त्वज्ञान आहे की कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झाडांची संख्या वाढवून उत्पादन वाढवणे हे होय.
कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर संशोधन करून त्यांनी त्याच पद्धतींचा वापर त्यांच्या पूर्ण शेतीमध्ये केलेला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या फार्ममध्ये दीड लाख पेक्षा जास्त फळझाडे आहेत व या फळझाडांचे लागवडीचे अंतर त्यांनी दहा बाय बारा फूट ते आठ बाय बारा फूट इतके ठेवलेले असून झाडांच्या दोन रांगांमधून ट्रॅक्टर आरामात जाऊ शकेल अशा पद्धतीने लागवड केलेली आहे. तसेच झाडाची वाढ नियंत्रित करण्याकरिता झाडांची छाटणी करण्यावर देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिलेला आहे.
म्हणजेच या पद्धतीचा वापर केल्यामुळे दोन एकर क्षेत्रामध्ये जितकी झाडांची संख्या लागते तेवढी संख्या त्यांनी एका एकर मध्ये मॅनेज केलेले आहे.फळझाडांच्या दोन रांगांमध्ये जो काही गॅप आहे त्यामध्ये ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची आंतरपीके घेतात. यामध्ये वेळेनुसार वेगवेगळ्या आंतर पिकांची लागवड केली जाते. बाजारपेठेतील दरांचा अभ्यास करून कोथिंबीर, हळद तसेच आले, दुधी भोपळा, टोमॅटो आणि कोबी सारख्या पिकांची लागवड केली जाते.
त्या ठिकाणी खतांसाठी देखील अनेक प्रकारच्या पद्धती वापरण्यात आलेल्या असून उदाहरणच घ्यायचे झाले तर प्रत्येक फळझाडाजवळ खड्डे खोदण्यात आलेले आहेत व यामध्ये खतांचा बेसल डोस भरून दिला जातो व सहा महिन्यापर्यंत याच खताचा वापर झाडांना केला जातो. विशेष म्हणजे क्षेत्रामध्ये जे काही फळझाडांची लागवड केली जाते त्याच्या अगोदर त्या ठिकाणी कमीत कमी प्रमाणामध्ये अगोदर काही झाडांची लागवड केली जाते व त्याचा पूर्ण अभ्यास केला जातो.
जर प्रत्येक अंगांनी एखादे व्हरायटी किंवा एखादे फळपीक त्यांच्या अभ्यासाला अनुरूप निघाले किंवा तसा रिझल्ट आला त्याचीच लागवड मोठ्या क्षेत्रामध्ये केली जाते.याकरिता त्यांनी पूर्ण क्षेत्रामध्ये एक एरिया राखीव ठेवलेला आहे व या ठिकाणी नवीन लावल्या जाणाऱ्या फळ पिकांची लागवड केली जाते व त्यावर पूर्ण टेस्ट केल्या जातात. जर टेस्टमध्ये प्रत्येक बाजूने संबंधित फळपीक खरे उतरले तरच त्याची लागवड केली जाते.
सगळ्या फळ उत्पादनाची मार्केटिंग कशी केली जाते?
अगोदर ते रायपूर बाजारपेठेमध्ये सगळ्या प्रकारचे फळे विक्रीसाठी पाठवत होते. परंतु त्या ठिकाणी जास्त प्रमाणात फळांची आवक झाल्यामुळे बऱ्याचदा बाजारभावात घसरण होत होती. तसेच त्या ठिकाणी आठ टक्के बाजारपेठेचा कर द्यावा लागत होता. तसेच बऱ्याचदा बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची मक्तेदारी दिसून येते व त्याचा देखील फटका बसत होता. त्यामुळे त्यांनी आता रायपूर ऐवजी संपूर्ण फळांचे उत्पादन हे दिल्ली आणि मुंबई या ठिकाणी पाठवायला सुरुवात केली.
या ठिकाणी देखील त्यांना त्याच समस्यांना तोंड द्यायला लागले. त्यानंतर त्यांनी झारखंड, भुवनेश्वर व रांची आणि ओडिसा राज्यातील काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला व डायरेक्ट प्रत्यक्ष म्हणजेच उत्पादक व ग्राहक अशी विक्री सुरू केली. एवढेच नाही तर या ठिकाणहून अनेक व्यापारी जागेवरूनच त्यांचा माल खरेदी करतात. त्यामुळे त्यांना बाजार भाव देखील चांगला मिळत आहे आणि वाहतुकीचा खर्च देखील वाचत आहे.
तसेच महत्त्वाचे म्हणजे हे सीताफळाचे सगळ्यात मोठे उत्पादक शेतकरी असल्यामुळे त्यांनी सिताफळ प्रक्रिया युनिटची सुरुवात केलेली असून आतापर्यंत सीताफळाचे उत्पादन तर त्याच्यावरची प्रक्रिया व साठवणूक इथपर्यंतचे काम त्यांनी सुरू केलेले आहे. सीताफळावर प्रक्रिया करून त्याचा ज्यूस बनवून आणि तोही संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने म्हणजे संपूर्ण ऑरगॅनिक ज्यूस निर्मितीवर ते भर देत आहेत.हे शेतकरी फ्रुट लागवड तसेच डेरी फार्मिंग, फूड प्रोसेसिंग आणि येणाऱ्या काळामध्ये कृषी पर्यटनावर देखील काम करणार आहेत.
जेएस ग्रुपची डेअरी फार्मिंग अशी आहे
या ग्रुपची डेअरी फार्मिंग देखील असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गीर गाईंचे पालन करण्यात येत आहे. या गाय पालन मधील त्यांचा उद्देश आहे की यामधून मिळणारे गोमूत्र आणि शेणाचा वापर ते त्यांच्या संपूर्ण क्षेत्रातील फळबागांना सेंद्रिय खतांचा पुरवठा करता यावा याकरिता आहे. कारण हा संपूर्ण फार्म ऑरगॅनिक पद्धतीने मॅनेज केला जात आहे. या डेरी फार्मवर 250 गिरगाय असून या ठिकाणी फार्मिंग ची व्यवस्था देखील खूप तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे यांचा गाय पालना मधील उद्देश म्हणजे गोमूत्र आणि शेण मिळवणे एवढाच आहे. या गावच्या दुधाचा वापर हा ताक आणि तूप बनवण्यासाठी प्रामुख्याने ते करतात. तसेच सगळ्या पद्धतीचे तूप आणि ताक हे देखील ऑरगॅनिक असेच आहे आणि या संपूर्ण फार्ममधील गाईंना जो काही चारा दिला जातो व तो सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला चाराच दिला जातो. तसेच या डेअरी फार्मच्या माध्यमातून जीवामृत वगैरे सेंद्रिय घटक तयार केले जातात व त्यांचा पूरवठा हा फळ पिकांना केला जातो त्यामुळे त्या ठिकाणचे उत्पादन देखील सगळे सेंद्रिय पद्धतीने होते.
ऑटोमेशन सिस्टीमचा केला जातो वापर
यामध्ये प्रामुख्याने फळबागांना खते देण्यापासून तर इतर कामांसाठी संपूर्णपणे ऑटोमेशन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली असून पिकांना खते देण्यापासून तर पाणी देण्यापासूनचे सगळे सिस्टम हे एक व्यक्ती हँडल करू शकतो. यामध्ये इस्रायली आणि ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा प्रामुख्याने यांनी वापर केलेला आहे. यामध्ये एक व्यक्ती 14 दिवसाचा सगळा प्रोग्राम लोड करतो व त्यानुसार ऑटोमॅटिक सगळी काम पार पडतात.