कृषी

Goat Rearing Tips: उन्हाळ्यात ‘या’ छोट्या टिप्स वापरा आणि शेळ्या निरोगी ठेवा! नाही होणार शेळ्यांचे नुकसान व होईल आर्थिक फायदा

Published by
Ajay Patil

Goat Rearing Tips:- शेळीपालन हा व्यवसाय आता अनेक शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोनातून करत असून नव्याने शेती व्यवसायात नशीब आजमावण्यासाठी आलेले अनेक उच्चशिक्षित तरुण शेळीपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचे चित्र आहे. कमीत कमी व्यवस्थापनामध्ये आणि कमी खर्चात चांगला आर्थिक नफा देण्याची क्षमता या व्यवसायामध्ये आहे.

परंतु शेळीपालना मधून चांगला आर्थिक नफा मिळवायचा असेल तर शेळ्यांचे योग्य व्यवस्थापन करणे देखील तितकेच गरजेचे असते व आता उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्यामुळे काही विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. कारण आता प्रत्येक दिवसाला तापमानात वाढ होताना दिसून येत असून उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता असते.

त्यामुळे या कालावधीत शेळी असो किंवा कुठलेही जनावर याकरिता पाणी आणि हिरव्या चाऱ्याची गरज वाढते. नेमके उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा उपलब्ध होत नसल्यामुळे शेळ्यांना आवश्यक असलेली पोषण तत्वे मिळणे कठीण होते व शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता भासून बरेच आजार होऊ शकतात.

त्यामुळे उष्माघात किंवा वजन कमी होणे यासारख्या समस्या टाळण्याकरिता उन्हाळ्याच्या कालावधीत शेळ्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. याविषयीचीच माहिती या लेखात आपण घेऊ.

 उन्हाळ्यात अशाप्रकारे या शेळ्यांची काळजी

1- शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. याकरिता शेळ्यांच्या आहारामध्ये प्रत्येक दिवसाला पाच किलो हिरवा चारा व एक किलो वाळलेला चाऱ्याचा समावेश करावा.

2- मांसवाढीकरिता आवश्यक असलेले पोषक घटक चाऱ्यामधून मिळावे याकरिता चाऱ्यांमध्ये क्षार मिश्रण व प्रतिजैविके मिसळून चारा खायला द्यावा.

3- चाऱ्यासोबत जर विकरांचा वापर केला तर चाऱ्याची पचनियता वाढते व त्यामुळे शेळ्यांच्या शरीराला पौष्टिक घटक मिळण्यास मदत होते व त्याचा सकारात्मक परिणाम हा मांस उत्पादन वाढण्यावर होतो.

4- तसेच प्रोबायोटिकचा वापर केला तर ओटीपोटाला आवश्यक असलेले सूक्ष्मजीव मिळतात व पचनक्रिया वेगात होते. त्यामुळे मांस उत्पादन वाढते व शेळीची प्रकृती देखील उत्तम राहते.

5- आहारामध्ये जर क्षार मिश्रणाचा वापर केला तर पोषक घटकांच्या कमतरतेचे आजार कमी व्हायला मदत होते व मांस उत्पादन वाढते व यासोबतच प्रतिजैविक वापरले तर शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते व शेळ्या आजारी पडत नाहीत.

6- उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे दुपारी 11 ते 4 या कालावधीत भरपूर उन्हाचे प्रमाण असते व यामुळे शेळ्यांमध्ये उष्माघात होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेळ्यांना लवकर सकाळी सहा ते नऊ या वेळेस चरण्यासाठी सोडावे व संध्याकाळी पाच ते सात ही वेळ ठेवावी.

7- शक्य असेल तर उन्हाळ्याच्या कालावधीत शेडमध्ये चाऱ्याची व्यवस्था करावी. उगीचच लांबपर्यंत चरण्यासाठी शेळ्या जर गेल्या तर अशा दूरवरच्या फिरण्यामुळे शेळ्यांच्या शरीराला गरजेप्रमाणे पोषण तत्वे मिळत नसल्याने शेळ्यांची प्रकृती ढासळू शकते.

8- तसेच शेळ्यांना स्वच्छ व थंडगार पाणी प्यायला द्यावे व 24 तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याप्रमाणे सोय करावी.

9- तसेच शेडमध्ये पुरेशी व जास्तीत जास्त जागा शेळ्यांना मिळेल याप्रमाणे सोयीसुविधा करावी. असे केल्याने शेड मधील तापमानात वाढ होत नाही.

10- उन्हाळ्यामध्ये शेळ्यांच्या ज्या काही लेंड्या असतात त्यापासून अमोनिया जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतो. त्यामुळे शेड मधील हवा खेळती राहणे खूप गरजेचे आहे.

11- तसेच शेळ्यांचे केस लांब वाढलेले असतील तर ते कापून घ्यावेत.

12- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कालावधीत शेळ्यांना लाळ्या खुरकूत आणि घटसर्प, आंत्रविषार या रोगांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. परंतु लसीकरण करताना लसीकरण करण्याच्या दोन दिवस अगोदर व नंतर इलेक्ट्रोलाईट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे. त्यामुळे लसीकरण केल्याचा ताण शेळ्यांवर येत नाही.

Ajay Patil