Tur Crop Variety:- खरीप हंगामातील महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकानंतर तूर हे महत्त्वाचे पीक आहे. जर आपण महाराष्ट्राचा दृष्टिकोनातून पाहिले तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मुख्य पीक म्हणून आणि इतर पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
तुर पिकापासून जास्त उत्पादन हवे असेल तर पावसाचे प्रमाण तसेच उपलब्ध जमिनीचा प्रकार इत्यादी गोष्टींचा विचार करून योग्य व्हरायटींची लागवड करणे फायद्याचे ठरते. तसेच जमिनीच्या प्रकारानुसार तुरीचे वाण लागवडीसाठी निवडणे खूप महत्त्वाचे आहे. कारण भारी जमिनीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या तुरीच्या व्हरायटी मध्यम ते हलक्या जमिनीत तेवढेच उत्पादन देतील असे होत नाही.
त्यामुळे लागवडीकरिता तूर पिकाच्या व्हरायटींची निवड करताना ती योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या लेखामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेले तूर पिकाचे काही वाणांची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
हे आहेत जास्त उत्पादन देणारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांचे विकसित केलेले वाण
1- फुले पल्लवी– तुरीची ही व्हरायटी 2024 मध्ये प्रसारित करण्यात आली व प्रामुख्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र तसेच छत्तीसगड, गुजरात आणि राजस्थान या राज्यांकरिता प्रामुख्याने प्रसारित आणि शिफारस करण्यात आलेली व्हरायटी आहे. साधारणपणे या व्हरायटीच्या पिकाचा कालावधी 155 ते 160 दिवसांचा आहे.
जर आपण फुले पल्लवी या वाणाचे प्रमुख वैशिष्ट्ये पाहिले तर हा मध्यम पक्वता कालावधीचा वाण असून याचे दाणे टपोरे फिक्कट तपकिरी रंगाची असतात. महत्वाचे म्हणजे तुर पिकावरील प्रमुख रोग जसे की मर आणि वांझ या रोगाना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम आहे व किडींच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शेंगा पोखरणारे अळी तसेच शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो. जर आपण या फुले पल्लवी व्हरायटी पासून मिळणारे उत्पादन पाहिले तर ते हेक्टरी 21 क्विंटल पर्यंत मिळू शकते.
2- फुले तृप्ती– तुरीची ही व्हरायटी 2022 मध्ये प्रसारित करण्यात आली आहे व खास करून महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांसाठी प्रसारित करण्यात आलेली आहे. फुले तृप्ती या व्हरायटीचा कालावधी पाहिला तर तो 160 ते 170 दिवसांचा असून या व्हरायटीची तुरीचे दाणे आकाराने टपोरे व रंग फिक्कट तपकिरी असतो.
तसेच मर आणि वांझ या रोगांना मध्यम प्रतिकारक्षम व्हरायटी असून शेंग पोखरणारे अळी व शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव कमी दिसून येतो. तसेच उत्पादन पाहिलं तर हेक्टरी 22 ते 23 क्विंटल पर्यंत मिळते.
3- फुले राजेश्वरी– ही व्हरायटी 2012 मध्ये प्रसारित करण्यात आली असून गुजरात तसेच मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्यांकरिता शिफारसीत व्हरायटी आहे. फुले राजेश्वरी या तुर पिकाच्या व्हरायटीचा कालावधी लागवडीनंतर 140 ते 150 दिवसांचा असून फुले राजेश्वरी या व्हरायटीच्या तुरीचे दाणे हे टपोरे असतात व रंगाने तांबडे असतात. फुले राजेश्वरी या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण मर आणि वांझ या रोगांना प्रतिकारकक्षम असून हेक्टरी उत्पादनक्षमता 28 ते 30 क्विंटल आहे.