कृषी

कशाला सोयाबीन आणि कपाशी पीक लागवडीकडे जाता? लागवड करा पैशाचे पीक असलेल्या तुरीची, ‘हे’ वाण देतील भरघोस उत्पादन

Published by
Ajay Patil

खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन आणि कपाशी पिकाची लागवड करतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाहिले तर कपाशी पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो व त्याचप्रमाणे सोयाबीन पिकावर देखील अनेक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो व त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो.

याउलट मात्र दोन्ही पिकांना मिळणारा बाजार भाव देखील कमी असल्याने शेतकऱ्यांना पिक लागवडीतून आर्थिक फायदा होण्याऐवजी नुकसानच होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु या व्यतिरिक्त खरीप हंगामातील महत्त्वाच्या असलेल्या तूर या पिकाचा विचार केला तर बरेच शेतकरी आता पैशाचे पीक म्हणून तूर पिकाकडे वळले आहेत.

योग्य व्यवस्थापन ठेऊन तुरीपासून कमी खर्चात चांगले उत्पादन मिळवता येते व या पिकाला बाजारभाव देखील चांगला मिळतो. यावर्षी देखील तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी तूर लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळतील अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे यावर्षी तूर लागवड क्षेत्रात वाढ होईल अशी एक शक्यता दिसून येत आहे.

त्याचप्रमाणे तुमचे देखील तूर लागवड करण्याचा प्लॅन असेल तर भरपूर उत्पादन मिळावे याकरिता तुरीच्या योग्य वाणांची निवड करणे देखील तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे आपण या लेखात दोन महत्त्वपूर्ण अशा वानांची माहिती घेऊ जे तुरीचे भरघोस उत्पादन देण्यासाठी ओळखले जातात.

 तुरीचे हे वाण देतील भरघोस उत्पादन

1- बीडीएन 711- तुरीचा हा वाण कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी विकसित केला असून मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त आहे. तुरीचा हा वाण लागवडीनंतर 150 ते 160 दिवसांमध्ये काढणीस तयार होतो.

या वाणाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी पाण्यात व पाण्याचा ताण पडला तरी देखील तो सहन करण्याची क्षमता या वाणात आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीसाठी बीडीएन 711 हा वाण नक्कीच फायद्याचा ठरेल.

2- गोदावरी( बीडीएन 2013-41) ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध असेल अशा शेतकऱ्यांनी गोदावरी या तुरीच्या वानाची लागवडीसाठी निवड करणे फायद्याचे ठरेल. गोदावरी हा वाण बीडीएन 711 या वाणाच्या तुलनेत उशिरा काढणीस तयार होतो

व त्याचा परिपक्वता कालावधी 170 दिवसांचा आहे. या वाणापासून भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर पाण्याची सोय म्हणजे सिंचनाची व्यवस्था आणि जमीन उत्तम असणे खूप गरजेचे आहे.

या दोन्ही वाणांचे तूर दाणे हे पांढऱ्या रंगाचे असतात. याशिवाय विदर्भ विभागासाठी बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले बीडीएन 716 हा वाण देखील मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी फायद्याचा असून या वाणाच्या तुरीच्या दाण्याचा रंग लाल असतो.

Ajay Patil