कृषी

घरची एक गुंठा शेती नसताना दूध व्यवसायामध्ये अनोखी प्रगती! प्रचंड कष्टाने दुध व्यवसायातून हा तरुण कमावत आहे वार्षिक 15 लाख

Published by
Ajay Patil

शेतीसोबत जोडधंदा म्हणून पूर्वापार भारतामध्ये पशुपालन हा व्यवसाय केला जातो. पशुपालन व्यवसायामध्ये प्रामुख्याने गाय व म्हशींचे पालन केले जाते व या माध्यमातून दुधाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत असतो. सध्या पशुपालन व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असून यामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करताना आपल्याला दिसून येत आहेत.

परंतु पशुपालन व्यवसाय म्हटला म्हणजे  साधारणपणे पशुपालकाकडे स्वतःची शेती असणे गरजेचे असते. कारण आपल्याला माहित आहे की, पशुंना चाऱ्याची आवश्यकता असते व याकरिता स्वतःची शेती असणे हे गरजेचे आहे. शेतामध्ये चाऱ्याचे उत्पादन घेऊन चाऱ्या वरचा बराचसा खर्च पशुपालकांना वाचवता येतो.

परंतु घरची एक गुंठा देखील शेती नसताना पशुपालन व्यवसाय सुरू करणे  म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखे आहे. परंतु या गोष्टीला खोटे ठरवत सोलापूर जिल्ह्यातील वारणा नदीच्या जवळ असलेल्या तांदूळवाडी येथील अमोल यशवंत यादव या तरुणाने घरची एक गुंठा शेती नसताना पशुपालन व्यवसाय यशस्वी करून दाखवला असून त्याचा आज या माध्यमातून वार्षिक टर्नओव्हर 15 लाखांपर्यंत आहे.

 अमोल यादवची दूध व्यवसायातील अनोखी प्रगती

अमोल यादव या तरुणाची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर अमोल हे बारावी उत्तीर्ण असून त्यानंतर सीएनजी चा एक अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. या अभ्यासक्रमाच्या पाठिंबावर त्याने कोल्हापूर जवळील शिरोली एमआयडीसीत 1996 च्या आसपास सीएनजी ऑपरेटरची नोकरी करायला सुरुवात केली. परंतु त्या ठिकाणी फक्त महिन्याला पाच हजार रुपये पगार मिळत होता.

घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे या आर्थिक उत्पन्नातून त्यांचे काहीच भागत नव्हते. त्यामुळे काहीतरी वेगळे करावे हा विचार मनात सतत होता. या सगळ्या प्रयत्नांमध्ये असताना अमोल याचे  काही मित्रांचा पशुपालन व्यवसाय होता व अधून मधून त्यांच्या गोठ्यावर अमोलचे जाणे व्हायचे. तेव्हा अमोल या गोठा व्यवस्थापनाचे बारकाईने निरीक्षण करायचा हळूहळू बऱ्याच गोष्टी आत्मसात करायला सुरुवात केली.

अमोल याच्याकडे शेती नव्हती.परंतु घरी दोन म्हशी अगोदर होत्या. परंतु त्या म्हशीपासून अवघे दोन ते तीन लिटर दुधाचे उत्पादन मिळायचे. घरच्या उदरनिर्वाहासाठी आई-वडिलांना दुसऱ्याच्या शेतावर मजूर म्हणून कामावर जायला लागत होते. या सगळ्या परिस्थितीत जातिवंत जनावर येऊन घरचा चांगला गोठा तयार करावा असे अमोलला वाटत होतं.

परंतु घरी आर्थिक परिस्थिती हलाकीचे असल्यामुळे हातात पैसा नव्हता.परंतु यामधून मार्ग काढण्यासाठी अगोदर घरच्या दोघ म्हशी त्यांनी अगोदर विकल्या. त्यातून आलेले पैसे व काही पैशांची उसनवारी करून त्यांनी एक जर्सी गाय विकत घेतली व अशाप्रकारे त्यांनी पशुपालन व्यवसायाला सुरुवात केली.

 अशाप्रकारे वाढवला पशुपालन व्यवसाय

एमआयडीसीतील नोकरीला रामराम करत घेतलेली एक गाय व तिचे व्यवस्थापन यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित केले. एका गायीच्या जोरावर सुरू केलेला या व्यवसायात थोडासा जम बसू लागल्याचे पाहून अजून दोन गाई आणाव्यात अशी प्लॅनिंग केली. परंतु परत पैशांचा प्रश्न उद्भवला. परंतु पैशांच्या तजवीज करण्याच्या प्रयत्नात असताना वारणा सहकारी दूध संघाच्या गावातील विठ्ठल डेरी च्या मदतीतून त्यांना काही आर्थिक मदत झाली व त्यातून त्यांनी बंगलोर वरून तीन गाई विकत आणल्या.

असे मिळून त्यांच्या गोठ्यात चार गाई झाल्या. बेंगलोर वरून आणलेले एक गाय 25 लिटर दूध देत होती. यामुळे आर्थिक चक्र व्यवस्थित सुरू झाले. त्यामुळे गोठ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेती नव्हती.परंतु न डगमगता घराच्या शेजारच्या जागेवर एक पत्र्याचे शेड उभे केले व गोठा तयार केला. आजूबाजूला वीट बांधकाम केले. अशा पद्धतीने हळूहळू पुढे आर्थिक बाबतीत स्थिरता मिळत गेल्यावर परत पंजाब वरून चार गाई आणल्या व सात वर्ष हा आठ गाईंचा गोठा व्यवस्थित सुरू आहे.

सध्या त्यांच्या गोठ्यातून दिवसाला 120 ते 125 लिटर सरासरी दुधाचे उत्पादन मिळत असून सरासरी आठवड्याला 40 ते 42 हजार रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. सध्या त्यांच्या गोठ्यामध्ये एक गाय 35 लिटर दूध देते. दोन गाई 28 ते 30 लिटर व बाकीच्या 25 लिटरच्या जवळपास दूध देतात. वासरांचे व्यवस्थापन देखील गोठ्यावरच केले व त्यातून तीन डेन्मार्क जातीची व दोन एबीएस जातीची वासरे तयार झाली आहे. हे सगळे दूध ते विठ्ठल डेरीच्या माध्यमातून वारणा दूध संघाला पाठवतात.

या दूध संघाच्या माध्यमातून दहा दिवसांनी त्यांना दुधाची पेमेंट मिळते. या पेमेंटचे व्यवस्थित आर्थिक नियोजन अमोल हे करतात. महिन्यातील एक बिल पशुखाद्यासाठी, दुसरे बिल ओल्या व वाळलेल्या चाऱ्याकरिता व तिसरे बिल स्वतःला राहते. अशा नियोजनाने त्यांना सरासरी 50 हजार रुपये महिन्याला शिल्लक राहतात. अमोल यांच्या  कडे स्वतःची जमीन नसल्यामुळे गोठा तयार करायला जागा नाही.

त्यामुळे त्यांनी आता जे जनावरे त्यांच्याकडे आहेत त्यांच्यावरच फोकस करत जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे मिळेल याबाबत प्रयत्न करत आहेत. चारा व्यवस्थापनासाठी त्यांना ऊस विकत घ्यावा लागतो.तसेच इतर चारा देखील ते विकत आणतात. याप्रकारे आणलेल्या चाऱ्यातून मुरघास तयार करतात व  हंगामामध्ये मका विकत घेऊन त्याचा उपयोग ओली वैरण म्हणून केला जातो.

अशाप्रकारे अमोल यादव यांच्या उदाहरणावरून दिसून येते की जर व्यक्तीमध्ये प्रचंड चित्त आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर मनात ठरवलेली इच्छा पूर्ण करता येते व अनन्यसाधारण असे यश देखील मिळते.

Ajay Patil