Sugarcane Variety :- ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांचे एक प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून या पिकाकडे पाहिले जाते.
ऊस या पिकाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी असून यामध्ये काही सुरू तसेच पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी खूप फायद्याच्या अशा व्हरायटी आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर को 86032 या उसाच्या जातिची मोठ्या प्रमाणावर शेतकरीलागवड करत असतात.
परंतु यासोबतच जर आपण फुले ऊस 15012 या मध्यम पक्व गटातील व जास्त उत्पादन देणाऱ्या जातीचा विचार केला तर ही जात फुले 265 या अधिक ऊस उत्पादन देणाऱ्या आणि को 94008 या साखरेचा अधिक उताराच येणाऱ्या जातीच्या संकरातून विकसित करण्यात आलेली जात आहे. याच उसाच्या जाती विषयीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
फुले ऊस 15012 उसाची जात शेतकऱ्यांना ठरेल फायद्याची
पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने 2022 मध्ये प्रसारित केलेली फुले 265 व को 94008 या जातींच्या संकरातून फुले ऊस 15012 या जातीचे निर्मिती करण्यात आलेली आहे. या जातीची सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
जर आपण फुले ऊस 15012 आणि को 86032 या जातींच्या तुलनात्मक अभ्यास केला तर को ८६०३२ या जातीपेक्षा उत्पादन 16% आणि साखरेचे उत्पादन 15.51% जास्त मिळाले आहे. तसेच या जातीच्या ऊसातील व्यापारी शर्कराचे प्रमाण हे को 86032 पेक्षा 0.40 युनिट जास्त राहिले आहे आणि फुले 265 पेक्षा 0.80 युनिटने अधिक आहे. साखर कारखान्यांना अधिक साखर उतारा देणारी आणि फुले 265 या उसाच्या जाती एवढे उत्पादन देणारी ही जात आहे.
फुले ऊस 15012 जातीची वैशिष्ट्ये
या जातीची प्रामुख्याने सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामा करिता शिफारस करण्यात आली असून या जातीचा ऊस जाड असतो व कांड्या सरळ असतात. ही जात पाण्याचा ताण सहन करणारी आणि जमिनीवर न लोळणारी जात असल्यामुळे सध्याच्या वातावरणीय परिस्थितीमध्ये ही उत्तम प्रतिसाद देऊ शकणारी जात आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे या जातीला तुरा अल्प प्रमाणात आणि उशिरा येत असल्यामुळे जास्त पाऊस असल्यास किंवा जास्त पावसाच्या प्रदेशात कमी तुरा आल्यामुळे इतर उसाच्या जातींपेक्षा उत्पादनात वाढ होते. या जातीच्या उसाची पाने मध्यम रुंद आणि सरळ असल्यामुळे बाष्पीभवन देखील कमी होते व पाण्याचा ताण सहन करू शकते.
महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या पानावर कूस राहत नाही त्यामुळे ऊस तोडताना त्रास होत नाही. दुसरे म्हणजे जनावरांना वाढे म्हणून द्यायला देखील त्रासदायक नाही. या जातीचा खोडवा उत्तम असतो व साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवल्यामुळे येणाऱ्या कालावधीत या जातीला चांगली मागणी असू शकते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे उसामधील लाल कुज व काणी या रोगांना मध्यम प्रतिकारक असलेली जात असून चाबूक काणी रोगाला प्रतिकारक आहे. तसेच खवले कीड, कांडी कीड, खोडकीड व शेंडे कीड इत्यादी किडींना कमी प्रमाणामध्ये बळी पडते.
फक्त साखरेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मिलीबग या किडीला काही प्रमाणामध्ये बळी पडू शकते. चोपन जमिनीमध्ये उत्तम उगवणीसाठी चांगली असून उत्पादनासाठी देखील चांगली आहे व रसवंतीसाठी उत्तम जात म्हणून ओळखली जाते.