Sugarcane Farming:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम सळसळता उत्साह आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तरी काहीतरी नवीन करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती या गुणांचा मेळ असतो. या सगळ्या जीवावर तरुणाई कुठल्या क्षेत्रामध्ये गेली तरी मोठ्या प्रमाणावर यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात व अनेक अशक्य गोष्टी शक्य देखील करतात.
गेल्या काही वर्षांपासूनचा जर विचार केला तर अनेक तरुण आता उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरीच्या मागे न लागता शेती क्षेत्राकडे पाऊल ठेवताना आपल्याला दिसून येत आहेत. तरुणाई शेतीमध्ये आल्यामुळे शेती क्षेत्राला एक फायदा असा झाला की,शेतीची परंपरागत पद्धत मागे पडून आधुनिक पद्धतीने शेती केली जाऊ लागली आणि पारंपारिक पिकांची जागा वेगवेगळ्या भाजीपाला पिके तसेच फळबागा व इतर पिकांनी घेतली.
तसेच तंत्रज्ञानाचा शिरकाव देखील या तरुणांनी शेतीमध्ये केल्याने कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीचे उत्पादन घेण्यामध्ये तरुण यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण बारामती तालुक्यातील मळद येथील अभयसिंग घाडगे या तरुण शेतकऱ्याचा विचार केला तर या शेतकऱ्याने ऊस लागवड करून एका एकरमध्ये 101 टन ऊस उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे.
कसे केले उसाचे नियोजन?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अभयसिंग घाडगे हे एक युवा शेतकरी असून त्यांनी ऊस लागवड करण्याचे ठरवले व ऊस लागवड करण्याअगोदर सोयाबीन व हरभरा ही पिके बेवड करण्याकरिता घेतली होती. या पिकांच्या नंतर त्यांनी ऊस लागवड केली व याकरिता उसाचे को 86032 या वाणाची निवड केली.
परंतु लागवडीकरिता त्यांनी या वाणाचे टिशू कल्चर रोपे आणली व त्या रोपांची निवड केली. ऊस लागवडीपूर्वी हरभरा व सोयाबीन यांचा बेवड मिळाल्यानंतर माळेगाव कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी एकरी बारा टन मळी व दोन टन राख टाकून लागवड योग्य जमीन तयार केली त्यानंतर शेतात पाच बाय दीड फूट अंतरावर सरी सोडली.
या सरीवर उसाचा को 86032 या वाणाच्या टिशू कल्चर रोपांची लागवड केली. विशेष म्हणजे खत नियोजना करता त्यांनी माती परीक्षण करून घेतले व त्या अहवालानुसार रासायनिक खतांचे नियोजन केले.
रासायनिक खत नियोजनामध्ये त्यांनी लागवड केल्यानंतर 50 ते 90 दिवस झाल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते, नत्रयुक्त खते तसेच संजीवके व सेंद्रिय खते व महाधन सारख्या रासायनिक खतांचा वापर केला. या ऊसाला त्यांनी पाणी व्यवस्थापन करताना ते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून केले.
या सगळ्या उत्तम नियोजनामुळे जेव्हा ऊस काढणीला आला तेव्हा 35 ते 52 टिपऱ्यांचा ऊस काढणीला तयार झालेला होता व एका उसाचे वजन साधारणपणे साडेतीन ते पाच किलो दरम्यान होते. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय व जिवाणू व इतर खतांचा चांगला वापर केल्यामुळे त्यांना हे यश आले.