तरुणाई आणि शेती क्षेत्रातील विविध प्रयोग हे खरंच शेतकऱ्यांना विचार करायला लावणारे आहेत. म्हणजेच कुठल्याही हंगामामध्ये कुठलेही पीक घेण्यापर्यंत या तरुण शेतकऱ्यांची मजल पोचलेली आहे.
तंत्रज्ञानाचा अनोखा वापर आणि वेगवेगळ्या पिकांची लागवड या माध्यमातून तरुणाई शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी कमीत कमी क्षेत्रात देखील घेण्याची किमया साध्य केलेली आहे. अगदी असाच एक प्रयोग पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावचे तरुण शेतकरी अमन इंगळे यांनी करून दाखवला.
विशेष म्हणजे अमन इंगळे यांचे वडील समील इंगळे यांची ओळख पंचक्रोशी मध्ये प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात व ते गेल्या 30 वर्षापासून ते शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतात.
फळबागांच्या दृष्टिकोनातून बघितले तर त्यांनी डाळिंब तसेच सीताफळ व अंजीर सारख्या फळबागांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतलेले आहे विशेष म्हणजे याची दखल महाराष्ट्र शासनाने देखील घेऊन 2016 साली त्यांना कृषीनिष्ठ हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अमन याने देखील पूर्णवेळ शेती करण्यासाठी निर्णय घेतला व विविध पिकांची लागवड करण्याचा प्रयोग अमन करतो. असाच एक अनोखा प्रयोग आम्हालाही केला व बिगर हंगामी काकडीची लागवड करण्याचे ठरवले व जून महिन्यात काकडीची लागवड करून त्या जोरावर चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले आहे.
अशाप्रकारे केली काकडीची लागवड
पुरंदर तालुक्यातील सिंगापूर या गावात राहणारे इंगळे कुटुंबीय मूळचे प्रयोगशील शेती करणारे म्हणून ओळखले जातात व त्यांच्याच घरात जन्मलेले अमन इंगळे यांनी देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शेती करण्याचा निर्णय घेतला व विविध पिकांची लागवड ते करतात.
यावर्षी जून महिन्यामध्ये त्यांनी बिगर हंगामी काकडीची लागवड करण्याचे धाडस केले व अर्ध्या एकर क्षेत्रावर काकडी लागवड केली. या काकडी लागवडीसाठी त्यांनी कोंबडी खत तसेच रासायनिक खते, बेसल डोस टाकून बेड तयार करून घेतले व त्यावर मल्चिंग पेपर आणि ठिबक अंथरून बांबू उभे करून जाळीचा आधार दिला व त्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला काकडीची लागवड केली.
काकडीची लागवड केल्यानंतर खत आणि फवारणीचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीचे ठेवले व वेळेत फवारण्या केल्यामुळे काकडींवर होणाऱ्या रोगांचा काकडीवर प्रादुर्भाव झाला नाही व विद्राव्य खत यांचा वापर ठिबकद्वारे केल्यामुळे खर्च देखील वाचला व पिकाला त्याचा भरपूर फायदा झाला.
किती मिळाले त्यांना उत्पादन?
काकडीची लागवड केल्यानंतर 40 व्या दिवशी त्यांना पहिला तोडा मिळाला. त्यानंतर पुढील दीड महिना काकडीची तोडणी चालते व आतापर्यंत त्यांनी पाचशे कॅरेट काकडीच्या मालाचे उत्पादन घेतले असून अजून त्या क्षेत्रामध्ये 200 कॅरेट उत्पादन मिळेल अशी शक्यता आहे.
सध्या चारशे रुपये कॅरेट प्रमाणे त्यांना बाजार भाव मिळाला असून सरासरी 700 कॅरेटचे दोन लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यामध्ये त्यांनी अर्धा एकर करता 80,000 चा खर्च केला असून तो जर वजा केला तर इंगळे कुटुंबीयांना दोन लाखांचा निव्वळ नफा या माध्यमातून होणार आहे.
विशेष म्हणजे काकडी पिकासाठी जो त्यांनी बांबू आणि तारांचा सांगाडा उभा केला आहे त्यावर ते इतर वेलवर्गीय पिकांसाठी देखील आधार म्हणून उपयोग करून खर्च कमी करतात. इतर वेलवर्गीय पिके देखील घेतात व याच बेडवर आणि त्याच जाळीवर ते आता काकडीनंतर दोडक्याची लागवड करणार आहेत.