२६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात सर्वाधिक नुकसान विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात झाले असून तेथे १ लाख २६ हजार ४८३ हेक्टर क्षेत्र, तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील ७९ हजार ४०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यात २७ नोव्हेंबर रोजी राज्यात २७.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती.
पहिल्या दोन दिवसांत अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक आकडेवारी महसूल विभागाने जारी केली होती. दरम्यान, आता तीन दिवसांनंतर कृषी विभागाने सुधारित आकडेवारी सादर करत ३ लाख ९३ हजार ३२५ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, यवतमाळमधील १ लाख २६ हजार ४३८ हेक्टर क्षेत्र बाधित क्षेत्रातील हरभरा, कापूस, तूर, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली येथे ७९ हजार ४०२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून येथील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा आणि सेनगाव येथील भाजीपाला, तूर, कापूस, सीताफ, पेरू आणि भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे.
बुलढाणा येथील नांदुरा, बुलढाणा, लोणार, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव, मलकापूर, खामगाव, शेगाव आणि नांदुरा येथील ६३ हजार २५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याठिकाणी शेतकऱ्यांचा भाजीपाला, मका, तूर, कापूस, द्राक्ष, कांदा आणि ज्वारी पिकांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
भाजीपाला, फळबागांना सर्वाधिक फटका
राज्यातील ३६ पैकी २२ जिल्ह्यांना अवकाळी व गारपिटीचा फटका बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान भाजीपाला व फळबागांचे झाले आहे. आंबा, फळझाडे, भात, कापूस, हरभरा, केळी, द्राक्ष, कांदा, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. रत्नागिरीतील ५३ हेक्टर, पालघरमधील ५४८ हेक्टर, तर ठाण्यातील ९१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.