Urban Farming:- पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये जेव्हा व्यक्ती राहतो तेव्हा तो निसर्गापासून दूर आणि इमारतींच्या जंगलांच्या विळख्यात पूर्णपणे अटकून पडतो अशी सध्या स्थिती आहे. अगदी बंदिस्त अशा वातावरणामध्ये शहरांमध्ये लोकांना राहायला लागते.
त्यामुळे बऱ्याचदा शहरात राहत असलेल्या लोकांना गावाकडे येण्याची हौस असते व निसर्गाच्या सानिध्यात काही काळ रमता यावे अशी इच्छा होत असते. निसर्गापासून बऱ्याच प्रमाणात दूर राहिल्यामुळे निसर्गातून मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी या लोकांपर्यंत जशाच्या तशा पोचतील याची शाश्वती नसते.
अगदी तुम्ही दैनंदिन आहाराकरिता भाजीपाला किंवा फळे देखील घ्यायची इच्छा झाली तरी तुमच्यापर्यंत ती ताजी पोचतील याची काहीच शाश्वती नाही. तुम्हाला जर ताजी फळे किंवा भाजीपाला हवा असेल तर तो गावाकडून बाजारपेठेत विक्रीसाठी आल्यानंतरच तो उपलब्ध होतो आणि तो नक्कीच फ्रेश नसतो ही वस्तुस्थिती आहे.
परंतु पुण्यासारख्या शहरांमध्ये राहून देखील तुम्हाला ताजा भाजीपाला व फळे मिळावेत याकरिता अभिजीत ताम्हाणे आणि पल्लवी पेठकर या दोन तरुणांनी अर्बन फार्मिंगचा प्रयोग यशस्वी केला असून इमारतींच्या जंगलांमध्ये त्यांचा हा मृदगंध नावाचा अनोखा शेती प्रयोग आता शेतकऱ्यांसाठी तयार झाला आहे. नेमके मृदू गंध नावाचा हा शेत प्रयोग काय आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
दोन तरुणांनी केला अर्बन फार्मिंगचा प्रयोग यशस्वी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुण्यासारख्या शहरांमध्ये अगदी इमारतींच्या जंगलात मृदगंध नावाचा एक अनोखा शेती प्रयोग अभिजीत ताम्हाने आणि पल्लवी पेठकर या दोन तरुणांनी यशस्वी केला असून हा अर्बन फार्मिंगचा प्रयोग आहे.
जेव्हापासून कोरोना येऊन गेला तेव्हापासून लोकांना मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे महत्त्व समजले. त्यामुळे आता प्रत्येक जण भाजीपाल्याच्या दृष्टिकोनातून तो ताजा आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला मिळावा याबाबतीत आग्रही असतात.
त्यामुळे अशा परिस्थितीत नागरिकांना स्वतः पिकवलेला ताजा भाजीपाला उपलब्ध करून देता यावा याकरिता या तरुणांनी पुण्यासारख्या शहरांमध्ये हा मृदगंध नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. मागील तीन वर्षापासून पुण्यातील वडगाव परिसरातील कोद्रे फार्म येथे हा प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे.
काय आहे नेमका हा प्रयोग?
या प्रयोगामध्ये ज्या नागरिकांना स्वतःची जमीन नाही परंतु त्यांना स्वतः पिकवलेला भाजीपाला हवा आहे अशा नागरिकांनी एक प्लॉट भाड्याने घ्यायचा आहे व त्यामध्ये त्यांना हव्या त्या पालेभाज्या आणि फळांची लागवड करायची आहे. जर तुम्हाला ही बाब शक्य नसेल तर मृदगंधाची टीम तुम्हाला याकरिता मदत करणार आहे.
यामध्ये भाजीपाला लागवड करण्यापासून तर त्याचे व्यवस्थापन आणि फवारणी पर्यंतची सगळी काम ही टीम करेल. याकरिता मृदगंधने प्रत्येकी 750 चौरसफूट आकाराचे 75 प्लॉट तयार केलेले असून एका प्लॉट साठी शेतकऱ्यांकडून प्रत्येक महिन्याला 3750 रुपये एवढे शुल्क आकारले जाते पंचवीस हजार रुपये ऍडव्हान्स घेतले जातात.
या माध्यमातून संबंधितांना भाजीपाल्याची बियाणे तसेच रोपे आणि आवश्यक खते सुद्धा मृदगंध टिमकडून दिले जातात. एवढेच नाही तर साधारणपणे याकरिता 200 ते 300 रुपये प्रति महिना असे वेगळे चार्जेस देखील आकारले जातात.
जर शेतकऱ्यांना स्वतः बियाणे किंवा खते आणायचे असतील तर ते देखील आणू शकतात अशी देखील सोय मृदगंधाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता शहरी लोकांना मृदगंधाच्या या अर्बन फार्मिंग च्या प्रयोगाच्या माध्यमातून नक्कीच ताटामध्ये ताजा भाजीपाला आणि फळे मिळतील हे मात्र निश्चित.