Crop Management:- यावर्षी महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतामध्ये सरासरी पर्जन्यमान खूप कमी झाल्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड प्रमाणात खालावल्याची स्थिती आहे. तरीदेखील महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली होती व उपलब्ध पाण्याच्या जोरावर पाण्याचे नियोजन करून उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत.
परंतु आता मार्च महिना अर्धा झाल्यामुळे साहजिकच उन्हाची तीव्रता वाढू लागली व पिकांना जास्तीच्या पाण्याची आवश्यकता या कालावधीत भासू लागली आहे. कारण जितके उष्णता वाढते तितके पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढतो व उपलब्ध पाणी पिकांना कमी पडू लागते व पिकांना पाण्याचा ताण निर्माण होतो.
यामध्ये उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकाचा विचार केला तर मात्र योग्य पद्धतीने या कालावधीत पाण्याचे नियोजन करणे खूप गरजेचे आहे. परंतु यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी,बोरवेलची पाणी पातळीत देखील प्रचंड प्रमाणात घट झाल्याने हवे तेवढे पाणी देण्यात शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होण्याची स्थिती आहे.
साधारणपणे जुलै किंवा ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या ऊसाला सध्या खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाण्याची गरज ओळखून किंवा उपलब्ध पाण्यात नियोजन करणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकासाठी पाण्याची गरज भागवण्यासाठी कुठल्या उपाययोजना करता येतील? याबद्दलची थोडक्यात माहिती घेऊ.
या गोष्टी ठरतील ऊस पिकासाठी पाणी नियोजनात महत्त्वाच्या
सध्या बाजारामध्ये पाणी धरून किंवा साठवून ठेवतील अशा पद्धतीच्या पावडरी मिळतात. या पावडरी शेणखतामध्ये मिसळून शेतात टाकल्या तर जेव्हा पाणी मिळते तेव्हा ही पावडर ते शोषून ठेवते व ताणाच्या प्रसंगी पिकांना पुरवते.
दुसरे म्हणजे ऊस मोठा असेल तर त्याची मोठी पाने काढून ती शेतामध्ये अंथरून घ्यावीत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दोन ते तीन टक्के पोटॅश घ्यावे व त्याचे द्रावण तयार करून ते पंधरा दिवसांच्या अंतराने पिकांवर फवारणी करून घ्यावे.
यामध्ये तीन किलो पोटॅशकरिता शंभर लिटर पाण्याचे प्रमाण ठेवणे गरजेचे आहे. समजा एक एकर ऊस असेल व उसाला चांगली वाढ असेल, आठ ते दहा कांडे असतील व पानांची संख्या देखील भरपूर असेल तर दोन ते तीन हजार लिटर पाण्याचे प्रमाण एका एकरकरिता फवारणीसाठी वापरावे.
यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी व्हायला मदत होते व पाण्याची गरज कमी होते. फवारणी करताना मात्र ती कडक उन्हात करू नये. महिन्यातून दोन वेळा सकाळी नऊ वाजेच्या आत या फवारण्या उरकून घेणे गरजेचे आहे.
तसेच गव्हाचे काड उपलब्ध असेल तर ते जमिनीवर अंथरून घ्यावे किंवा पालापाचोळा असला तरी अंथरण्यासाठी हा एक योग्य पर्याय आहे. यामुळे जमीन तापणार नाही व जमीन तापली नाही तर पाण्याची गरज आटोमॅटिक कमी होते.
अशा पद्धतीने या छोट्या उपाययोजना केल्या तरी कमीत कमी पाण्यात उसाचे नियोजन करणे शक्य होईल.