दररोजच्या आहारातील भाजीपाला अत्यंत कडाडला आहे. भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. इतर ठिकाणी काटकसर केली जाईल पण रोजच्या जेवणासाठी लागणाऱ्या भाजीपाल्यासाठी आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे.
नोव्हेंबर महिन्यात गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने पिके झोडपली आहेत. त्यामुळे भाजीपाला बहुतांश ठिकाणी भुईसपाट झाला. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. याचा परिणाम किमतीवर झालेला दिसतो. नुकताच भरलेल्या राहुरीच्या आठवडे बाजारात वांग्याचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये, गवार १५० रूपये, तर दोडक्याचा भाव प्रति किलो ५० रुपयांवर गेलेला पाहायला मिळाला.
दोन वर्षांतील उचांकी भाव
भाजीपाल्याचे भाव अत्यंत वाढले आहेत. चंपाषष्टी, लग्नसराई आदींमुळे दरवर्षी या दिवसात वांग्याला चांगला भाव मिळतो. परंतु, यंदा मागील दोन वर्षांचा इतिहास पाहिला तर वांग्याने उच्चांकी १०० रूपयांच्यापुढे भाव मिळवला आहे. यंदा पावसाने सर्वच नक्षत्रात दिलेली हुलकावणी, दीड महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने झालेले नुकसान आदी कारणाने देखील भाव वाढेल आहेत.
मागणीच्या तुलनेत आवक नाही त्यामुळे भाजीपाल्याच्या बाजारभावात तेजी आली आहे. जर आवक वाढली तर भाव मात्र कमी येऊ शकतात. परंतु याला आणखी थोडा अवधी लागेल असे वाटत आहे.
अशी होती मार्केटची स्थिती
राहुरीच्या बाजारात गवार १५० रूपये किलो, दोडके ९० रूपये, भेंडी ७५ रूपये, घोसाळे ६० रूपये किलो, कारले ७० रूपये किलो, शेवगा शेंगा ६० रूपये किलो, वालाच्या शेंगा ७० रूपये किलो, मेथीभाजी जुडी २५ रूपये, किरकोळ बाजारात वांगी १२० तर गवार शेंगा १६० ते १७० रुपये किलो असे भाव मिळत होते.