Vegetable Farming : शेतकरी बांधव आता भाजीपाला पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. यामध्ये कोबीचा देखील समावेश होतो. मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हिरवी कोबी बघितली असेल आणि खाल्ली देखील असेल. मात्र हिरवी कोबीव्यतिरिक्त बाजारात आता लाल कोबीची देखील मोठी मागणी वाढत आहे.
लाल कोबी आरोग्यासाठी अधिक लाभप्रद सिद्ध होत असल्याने याची बाजारात मागणी वाढत आहे आणि परिणामी याची शेती करण्याचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. यामुळे आज आपण लाल कोबी शेतीमधील काही महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
लाल कोबी लागवडीसाठी जमीन आणि हवामान
हलकी चिकणमाती असलेली जमीन त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असते. लाल कोबीची लागवड चिकणमातीच्या जमिनीतही करता येते. मातीचा pH 6.0 ते 7.0 दरम्यान असल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. लाल कोबीच्या लागवडीसाठी सौम्य हिवाळा चांगला मानला जातो. यासाठी तापमान 20 ते 30 अंशांच्या दरम्यान असावे. उच्च तापमानात त्याचा वरचा भाग चांगला विकसित होत नाही.
लाल कोबी लागवड केव्हा आणि कशी करावी
पेरणी सप्टेंबर ते मध्य नोव्हेंबर किंवा मध्य जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान करता येते.
लागवडीपूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करावी. जेव्हा माती भुसभुशीत होते तेव्हा फळी मारावी.
यामुळे पहिल्या पिकांचे अवशेष, तण आणि कीटक शेतातील पूर्णपणे नष्ट होतील.
शेतात नांगरणी करताना हेक्टरी १० ते १२ टन चांगले कुजलेले शेण टाकावे. यासोबतच 60 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी देता येते.
यानंतर समान अंतर देऊन बेड तयार करा. त्याच्या रोपामध्ये 30 ते 35 सें.मी.चे अंतर असावे.
लावणीनंतर हलके पाणी द्यावे, त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. यानंतर आवश्यकतेनुसार 12 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
त्याच्या लागवडीसाठी 400-500 ग्रॅम प्रति हेक्टर बियाणे वापरले जाते. त्याची रोप 20 ते 25 दिवसात तयार होते.
पूर्ण विकसित झाल्यावरच कापणी करा, कारण आधी कापणी केल्यावर ती लहान आणि आकाराने कमी राहते.
लाल कोबीच्या सुधारित जाती
लाल कोबीच्या दोन सुधारित जाती आहेत. रेड-रॅक जातीचे वजन सुमारे 50 ते 300 ग्रॅम असते. आणखी एक प्रकार रेड ड्रम हेड आकाराने मोठा, आतून गडद लाल आणि भरीव असतो. त्याचे एकूण वजन 500 ग्रॅम ते 1.5 किलो दरम्यान असते.
बाजारात चांगली मागणी आणि भाव
लाल कोबीचे उत्पादन 150 ते 200 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. बाजारात हिरव्या कोबीला 800 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. दुसरीकडे, बाजारात लाल कोबीचा भाव 3000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल आहे. लाल कोबी बहुतेक शॉपिंग मॉल्स, मोठी दुकाने, ऑनलाइन मार्केट आणि मोठ्या भाजी मार्केटमध्ये विकली जाते. निश्चितच लाल कोबीला चांगला दर मिळाला तर याच्या शेतीतून शेतकऱ्यांना हेक्टरी सहा लाखांपर्यंतची कमाई होऊ शकते.