कृषी

Weather Update : तो पुन्हा येतोय…! 13 आणि 14 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार पाऊस ; भारतीय हवामान विभागाचा इशारा

Published by
Ajay Patil

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची काळजाचे धडधड वाढत होती. भारतीय हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडणार आहे.

सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग करत आहेत. तसेच काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी पीक पेरणीची लगबग पाहायला मिळत आहे. अशातच हवामान विभागाने राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

साहजिकच यामुळे शेती कामाला ब्रेक लागणार आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांची पिके वावरात उभे आहेत अशा शेतकरी बांधवांना फटका बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 13 आणि 14 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाच्या मते मध्य महाराष्ट्र आणि कोकणात 13 आणि 14 ला पाऊस पडणार आहे.

तसेच येत्या पाच ते सहा दिवसात दक्षिण कोकणात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पावसासाठी कारणीभूत ठरणार आहे. पुढील 24 तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता अजूनच वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून 12 नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे.

यामुळे दक्षिण भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात देखील पाऊस कोसळणार आहे. यामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. या कालावधीत मात्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. निश्चितच 13 आणि 14 नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असल्याने संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

Ajay Patil