भारतात पहिल्यांदा कॉफीची लागवड कुठे झाली? आनंद महिंद्रांनी ‘कॉफी’चा इतिहास उलगडत सांगितले “ते’ ठिकाण

आनंद महिंद्रांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये कर्नाटकातील चिकमंगळुरूच्या इतिहासाची माहिती दिली, जिथं 1670 मध्ये बाबा बुदान यांनी कॉफीची लागवड केली होती.

Published on -

महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योगसमूहाचे प्रमुख आणि भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडिया अकाऊंट नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

त्यांनी काय बोलावे, कोणत्या विषयावर व्यक्त व्हावे किंवा कोणत्या ठिकाणाचा उल्लेख करावा, यापासून ते त्यांच्या पोस्टपर्यंत सर्वच गोष्टींची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते. नुकतेच त्यांनी X वर एक खास पोस्ट शेअर केली, ज्यामुळे एका सुंदर ठिकाणाबरोबरच त्याच्या ऐतिहासिक माहितीने सर्वांचे लक्ष वेधले गेले.

१६७० मध्ये लागवड

या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी कर्नाटकातील चिकमंगळुरू या निसर्गरम्य ठिकाणाचा एक मनमोहक फोटो शेअर केला आणि त्यासोबत एक रोचक माहितीही दिली. त्यांनी लिहिले, “अनपेक्षित ठिकाणांवरच रहस्यांचा उलगडा होतो. हे तेच ठिकाण आहे, जिथे सुमारे 1670 मध्ये बाबा बुदान नावाच्या व्यक्तीने येमेनहून आणलेली कॉफीची रोपे लावली होती.” या कॅप्शनसह त्यांनी चिकमंगळुरूच्या निसर्गसौंदर्याची झलक दाखवली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी या ठिकाणाचे कौतुक केले आणि तिथे भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.

काॅफीसाठी प्रसिद्ध

चिकमंगळुरू हे कर्नाटकातील एक लोकप्रिय गिरीस्थान आहे, जे विशेषतः कॉफीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. भारतात कॉफीची लागवड सर्वप्रथम याच ठिकाणी झाली, ज्यामुळे या भागाला कॉफीच्या इतिहासात विशेष स्थान आहे. येथील कॉफीच्या मळ्यांमध्ये पर्यटकांना फिरण्याची संधी मिळते. स्थानिक लोक येथे पर्यटकांसाठी कॉफीच्या मळ्यांमध्ये राहण्याची आणि स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची व्यवस्था असलेली खास टुरिस्ट पॅकेजेस उपलब्ध करतात. चिकमंगळुरूमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ओढे, नद्या, डोंगररांगा आणि मंदिरे यांसारखी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

इतर पाहण्यासारखी ठिकाणे

या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांना मुल्लायनगिरी पर्वत, हेब्बे धबधबा, बाबा बुदन गिरी, भद्रा वन्यजीव अभयारण्य आणि कॉफी संग्रहालय या प्रमुख स्थळांना भेट देण्याचा सल्ला दिला जातो. चिकमंगळुरूच्या या भागात समृद्ध जैवविविधता आढळते आणि येथील हवेत एक सुखद गारवा जाणवतो. याशिवाय, इथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठीही अनेकजण उत्सुक असतात. आनंद महिंद्रा यांच्या या पोस्टमुळे चिकमंगळुरूच्या सौंदर्याबरोबरच त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाकडेही सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe