शेती आणि शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक प्रकारच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती संबंधीच्या अनेक कामांकरिता अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून या सगळ्या प्रयत्नातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.
यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या देखील अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत व त्यातीलच सन 2018-19 पासून राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महत्त्वाची योजना असून ती आता पुन्हा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केंद्र शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांना फळबाग लागवड बाबीचा लाभ मिळत नाही त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे अनुदान मंजूर होते ते पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 आणि तिसऱ्या वर्षी 20% अशा तीन वर्षांमध्ये दिले जाते. या व अशा अनेक प्रकारच्या अटी या योजनेच्या आहेत. त्यामुळे या लेखामध्ये आपण या योजनेच्या संबंधीची महत्त्वाची माहिती घेऊ.
भाऊसाहेब फुंडकर लागवड योजनेचे स्वरूप
1- या योजनेमध्ये शेतकऱ्यांना जे काही अनुदान मंजूर होते ते पहिल्या वर्षी 50% तसेच दुसऱ्या वर्षी 30 व तिसऱ्या वर्षी वीस टक्के अशा तीन वर्षांमध्ये दिले जाते. परंतु यामध्ये शेतकऱ्यांना जर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचा अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी जे काही फळबागांची लागवड केलेली
असेल तर त्या झाडांची जीविताचे प्रमाण बागायती झाडांकरिता 90% तर कोरडवाहू करीता 80 टक्के ठेवणे आवश्यक आहे. यापेक्षा जर झाडांची संख्या कमी झाली तर मात्र शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने झाडे आणून लागवड करून जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे असते.
2- यामध्ये जमिनीचे क्षेत्राचे देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेली असून कोकण विभागासाठी दहा गुंठे व इतर विभागांमध्ये कमीत कमी वीस गुंठे अशी क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
3- यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रथमता योजनेतील निकषाप्रमाणे लाभ घेणे गरजेचे असते व उरलेल्या क्षेत्रासाठी लाभार्थी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
4- या योजनेमध्ये अल्प तसेच अत्यल्प भूधारक, महिला व दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येते.
5- या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत लाभार्थ्यांना ठिबक संचांच्या उभारणी करिता देखील शंभर टक्के अनुदान देण्यात येईल.
कोणत्या फळपिकाला किती मिळते अनुदान?
1- आंबा कलमे– लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडे संख्या 100 व मिळणारे अनुदान हेक्टरी कमाल 53 हजार 561 रुपये
2- आंबा कलमे(सघन लागवड)- लागवडीच्या अंतर पाच बाय पाच आणि हेक्टरी झाडांची संख्या 400 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान मर्यादा 1 लाख 1 हजार 972 रुपये
3- काजू कलमे– लागवडीचे अंतर सात बाय सात व हेक्टरी झाड संख्या 200 आणि हेक्टरी मिळणारे अनुदान 55 हजार 578 रुपये
4- पेरू कलमे(सघन लागवड)- हेक्टरी झाडांची संख्या 342 आणि हेक्टरी मिळणारे कमाल अनुदान दोन लाख 2 हजार 90 रुपये
5- पेरू कलमे– लागवडीच्या अंतर 6×6 आणि हेक्टरी झाडांची संख्या 277 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 62 हजार 253 रुपये
6- डाळिंब कलमे– मिळणारे अनुदान एक लाख 9 हजार 487 रुपये
7- संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू कलमे– लागवड अंतर सहा बाय सहा आणि हेक्टरी झाडांची संख्या 277 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 62 हजार 578 रुपये
8- संत्रा कलमे– हेक्टरी मिळणारे अनुदान 99 हजार 716 रुपये
9- सिताफळ कलमे– लागवड अंतर पाच बाय पाच, हेक्टरी झाडांची संख्या 400 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 72 हजार 531 रुपये
10- आवळा कलमे– मिळणारे हेक्टरी अनुदान 49 हजार 735 रुपये
11- चिंच कलमे– मिळणारे हेक्टरी अनुदान 47 हजार 321 रुपये
12- जांभूळ कलमे– लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडांची संख्या 100 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 47 हजार 321 रुपये
13- कोकम कलमे– मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 47 हजार 260 रुपये
14- फणस कलमे– लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी झाडांची संख्या 100 व मिळणारे हेक्टरी कमाल अनुदान 43 हजार 516 रुपये
15- अंजीर कलमे– हेक्टरी मिळणारे कमाल अनुदान 97406 रुपये
16- चिकू कलमे– लागवडीचे अंतर दहा बाय दहा आणि हेक्टरी मिळणारे कमाल अनुदान 52 हजार 61 रुपये
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
1- या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर फळबाग लागवडी करीता ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे.
2- ज्या शेतकऱ्यांची कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.
3-
या योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक शेतकऱ्यालाच मिळतो.4- लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे व शेतीवर संयुक्त मालकी हक्क असेल तर इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत शेतकरी लाभ घेऊ शकतात. सातबारावर जर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमती आवश्यक आहे.
5- यामध्ये परंपरागत वन निवासी अधिनियम 2006 नुसार वनपट्टेधारक शेतकरी देखील पात्र असतात.
6- जर एखाद्या लाभार्थ्याने इतर शासकीय योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड केली असेल तर ते क्षेत्र सोडून या योजनेचे विहित क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येतो.
या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सातबारा व 8 अ चा उतारा, हमीपत्र व संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र( अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी) इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असते.