३५४ विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात १ कोटी ३ लाखांचे अर्थसहाय्य वर्ग !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत पात्र असलेल्या ३५४ विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर १ कोटी ३ लाख ६३ हजार १६० रूपयांचे अर्थसहाय्य अनुदान वर्ग करण्यात आले आहे. २०२० पासून अर्थसहाय्यापासून वंचित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्‍यामध्ये अर्थसहाय्य अनुदान वितरित करण्यात आले आहे. अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

अर्थसहाय्यासाठी शासनाकडून जिल्ह्यासाठी १ कोटी ४ लाख १ हजार रूपयांचा निधी १८ मे २०२३ रोजी अहमदनगर समाज कल्याण विभागास प्राप्त झाला होता. या निधीतून २०२०-२१ मधील प्रलंबित एका लाभार्थी विद्यार्थ्यास १८६५० रूपये, २०२१-२२ मधील दुसऱ्या हप्त्यापासून वंचित ३३ लाभार्थी विद्यार्थ्यांना ५ लाख ४५ हजार २१० रूपयांचे अर्थसहाय्य वर्ग करण्यात आले आहे. २०२२-२३ मधील प्रलंबित ३२० लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर ९७ लाख ९९ हजार ३०० रूपयांचा अर्थसहाय्य निधी वर्ग करण्यात आला आहे.

मागासवर्गीय मुलामुलींना उच्च ‍शिक्षण घणे सुकर व्हावे. यासाठी राज्यात मागासवर्गीय मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृहाची योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात १८ ( मुले-९ व मुली- ९) शासकीय वसतिगृहे सुरू असून त्यामधून मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य इ. सोयी सुविधा पुरविण्यात येतात.

सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच यानंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन,निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रू.६०,०००/- इतर महसुली विभाग शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.५१,०००/- व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रू.४३,०००/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

या योजनेच्या लाभासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडे अर्ज करावेत. असे आवाहन श्री.देवढे यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24