अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपुर तालुक्यातील उंदिरगाव येथील एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभाग, महसूल, नगरपालिका व पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
मास्क, सॅनिटायझर,सामाजिक अंतर याबाबत नागरिक उदासीन झाले आहे. त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मास्क न लावणाऱ्यांवर दररोज श्रीरामपुरात पोलिसांची दंडात्मक कारवाई होत असली, तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नाही.
उंदिरगाव येथे एकाच कुटुंबातील दहा जण बाधित झाल्याने आणि इतर ठिकाणीही रुग्ण वाढून तालुक्याचा आकडा २२ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह महसूल, नगरपालिका व पोलिस विभाग सतर्क झाला आहे.
नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी प्रांताधिकारी अनिल पवार, उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार प्रशांत पाटील,पोलिस निरीक्षक संजय सानप, मुख्यधिकारी गणेश शिंदे यांच्या पथकाने बसस्थानक,
भाजी मंडई, बाजारपेठ व मुख्य रस्त्यावर फिरून नियमांचे उल्लंघन करणारे व मास्क न वापरणाऱ्या सुमारे २०० जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.