अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे सोनईचा रविवारचा आठवडे बाजार आणि स्थानिक कोरोना दक्षता कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार रविवारचा जनता कफ्र्यू यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता.
जनता कफ्र्यूनिमित्त सर्व दुकाने सकाळपासून बंद होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेला सोनईचा जुन्या दुचाकी मोटरसायकलचा बाजारही बंद होता.
या जनता कफ्र्यूमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप वगळण्यात आलेले होते.
जिल्ह्यात सायंकाळची संचारबंदी असताना सोनईत शनिवारी ३ एप्रिल रोजी आठनंतर जी दुकाने उघडी होती, अशा सात दुकानदारांविरुद्ध सोनई पोलिसांनी कारवाई करत प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला. त्यामुळे काल कोणीही चोरून लपून दुकाने उघडली नाही.
सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र करपे व पथकाने दिवसभर सर्वत्र फेरफटका मारून परिस्थितीची पाहणी केली.
सोनई व्यापारी पेठ, नवीपेठ, बस स्थानक, शिवाजी रोड, संभाजी चौक इत्यादी ठिकाणी व सर्वत्र जनता कफ्र्यूला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने सोनई बंद यशस्वी झाला.